पाऊस पडावा म्हणून भोर पत्रकारांचे रायरेश्वराला साकडे
बळीराजा धास्तावला : भात पिके संकटात

भोर : तालुक्यात गेले पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात रोप सुकून गेले आहे. तर पिकांची लावणी रखडल्याने बळीराजा धास्तावला आहे. पावसाने लवकरच हजेरी लावावी व यंदा पिके जोमात यावी, यासाठी भोर तालुक्यातील पत्रकार बंधूंनी श्रावणातील पहिला सोमवारचे ( दि.२७ ) औचित्य साधून ऐतिहासिक रायरेश्वर शिवमंदिरात अभिषेक करून देवाकडे साकडं घातलं आहे.
जून, जुलै महिना सरला तरी पावसाने हजेरी लावली नसल्याने खरिपातील पिके सुकून वाया चालली आहेत, तर भाताचे आगर असलेल्या भोर तालुक्यात पावसाअभावी भात पीक वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे राहिले आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा व पाऊस पडावा यासाठी शिवमंदिरात शंभो महादेवांना पत्रकारांनी साकडे घातले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत किंद्रे, जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत जाधव, तालुका संघाचे उपाध्यक्ष अर्जुन खोपडे, कोषाध्यक्ष संतोष म्हस्के, झी न्युजचे निलेश खरमरे, पत्रकार स्वप्नील पैलवान, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कुलकर्णी, ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे, प्रसाद सोले, बापू दिघे, माऊली शिंदे आदी उपस्थित होते.