पाणी फाउंडेशनच्या वृक्षप्रेमींनी केली इंदापूरची हरित वारी
महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
इंदापूर : सातारा जिल्ह्यातील शिरढोण (ता.कोरेगांव) येेेथील पाणी फाऊंडेशनच्या वृक्षप्रेमींनी इंदापूरला भेट देवून शहा नर्सरी,अटल घन,कचरा डेपो येथील वृक्ष लागवडीद्वारे हरित झालेल्या परिसराची,ऑक्सीजन पार्कची पाहणी केली.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
याबाबत माहिती अशी, संजय शेडगे, सचिन जाधव, विजय खंडे,गणेश घोरपडे या वृक्षप्रेमींसह इतर पाहणीसाठी आले होते. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्यासमवेत परिसराची पाहणी केली. शहा नर्सरीतून झाडे जगवण्याच्या हमीवर निंब,पिंपळ,बेहडा, काटेसावर,बहावा,विलायची चिंच,आंबा,कांचन व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सहाशे झाडांची रोपे मोफत स्वरुपात त्यांनी शिरढोण येथे वृक्षारोपण करण्यासाठी नेली. मुकुंद शहा यांनी झाडे व त्यांच्या संगोपनाबाबत वृक्षप्रेमींना माहिती दिली.
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने अल्ताफ पठाण, सहायक आरोग्य निरीक्षक अशोक चिंचकर, लिलाचंद पोळ व अटल घन मधील झाडांचे निगा राखणारे चंद्रकांत शिंदे यांनी राबवण्यात आलेल्या उपक्रमाची व झाडांबद्दल माहिती दिली.
वृक्षप्रेमी संजय शेडगे व सचिन जाधव यांनी पाहणीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले,येथील वृक्षसंपदा पाहुन आम्ही भारावून गेलो आहोत. कचरा प्रक्रिया केंद्रावर येताना त्या ठिकाणी दुर्गंधी व अस्वच्छता असेल असा आमचा समज झाला होता. मात्र दुर्गंधी सोडाच उलट सुंदर व सुबक अशी बाग तेथे दिसली. या बाबत नगरपरिषद विशेषतः नगराध्यक्षा अंकिता शहा,अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान वाटला. आम्ही ही आमच्या गावी इंदापूर नगरपरिषदेच्या धर्तीवर असाच उपक्रम राबवू.
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून इंदापूर नगरपरिषदेने टाऊन हॉलच्या पाठीमागील बाजूस केंद्र शासनाच्या ‘अटल आनंद घन वन’योजनेअंतर्गत वीस गुंठे जमिनीवर दोन ते अडीच हजार वृक्षांची लागवड व पालन पोषण करून ऑक्सिजन पार्कची उभारणी केली आहे. कचरा प्रक्रिया केंद्र येथे ही एक छोटेखानी बगीचा तयार केला आहे. तेथील ओल्या कचऱ्यात आलेल्या व सापडलेल्या आंब्यांच्या कोया,चिंचोके,
रामफळ,सीताफळ,जांभूळ व इतर बियांपासून रोपे तयार करून छोटीशी रोपवाटिका तयार केली आहे. कचऱ्यात आलेल्या टाकाऊ वस्तूंचा उपयोग करत त्यामध्ये विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली आहे.