नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री संजय भेगडे, तर सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : पुणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या तळेगाव येथील ऐतिहासिक असलेल्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड करण्यात आली.
माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेचे सर्व विषय झाल्यावर संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पाडण्याचे अधिकार संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना देण्यात आले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सन २०२० ते २०२५ या पाच वर्षांसाठी संचालक मंडळ पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्षपदी गणेश खांडगे, खजिनदारपदी राजेश म्हस्के, तर सहसचिवपदी नंदकुमार शेलार यांची निवड करण्यात आली. सचिवपदी पुन्हा संतोष खांडगे यांची फेरनिवड करण्यात आली. संचालकपदी रामदास काकडे, चंद्रकांत शेटे, दामोदर शिंदे, यादवेंद्र खळदे, महेशभाई शहा, वसंतराव भेगडे, सोनबा गोपाळे, शंकर नारखडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिका-यांचा सन्मान कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेच्या सल्लागारपदी माजी आमदार कृष्णराव भेगडे, सुरेशभाई शहा, वसंतराव खांडगे, गणपतराव काळोखे, माजी आमदार रुपलेखाताई ढोरे हे काम पाहणार आहेत.
संस्थेचे नवनिर्वाचीत सचिव संतोष खांडगे म्हणाले, “मागील पाच वर्षाच्या काळात संस्थेत अनेक शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. संस्थेचा गुणात्मक दर्जा वाढला. याचीच पोचपावती म्हणून माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी माझ्यावर विश्वास ठेवत सचिवपदाची धुरा पुन्हा सोपवली आहे.”
यावेळी कृष्णराव भेगडे, संजय भेगडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव संतोष खांडगे यांनी केले, तर आभार सहसचिव नंदकुमार शेलार यांनी मानले.