Friday, April 18, 2025
Latest:
कोरोनाखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रशासकीयमावळविशेषशिरूरहवेली

नाताळ, थर्टी फर्स्ट व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ‘या’ भागांत होणार जमावबंदी लागू, २५ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान जमावबंदी

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २५ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू  करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे. यानिमित्ताने जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी याबाबतचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने महापालिकांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्याबाबतचे अहवाल ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि पिंपरी चिंचवडमधील विशेष शाखेच्या उपायुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात संचारबंदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी देशमुख यांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे.

■ या भागात जमावबंदी लागू…
——————-
तळेगाव दाभाडे नगर परिषद, चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, तळेगाव औद्योगिक वसाहत, चाकण औद्योगिक वसाहत, हिंजवडी आयटी पार्क या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. लोणावळा, अॅम्बी व्हॅली, लवासा, भुशी डॅम, मुळशी डॅम, ताम्हिणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटन स्थळी तसेच फार्म हाऊस, रिसॉर्ट या ठिकाणी नाताळ आणि नववर्षानिमित्त २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत गर्दी होण्याची शक्यता आहे. मावळ, मुळशी आणि हवेली या तालुक्यांमध्ये तसेच शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जमावबंदी लागू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!