मुंबईकरांची गावाकडील नागरिकांना मदत
स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू कुटुंबाना अन्नधान्य किट व सलून व्यावसायिकांना पीपीई किटचे वाटप, मुंबईच्या जय मल्हार मित्र मंडळाचा उपक्रम
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : अविनाश घोलप
घोडेगाव : ७४ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जय मल्हार मित्रमंडळ, मुंबई ( मुळगाव कडधे, ता. खेड ) यांनी आपल्या मातृभूमीचा विचार करून आपण आपल्या गावातील गरीब व गरजू कुटुंबांसाठी काहीतरी केले पाहिजे, हे आपले कर्तव्य आहे असे ध्येय मनात ठेवून गावातील गरजू कुटुंबांना अन्न धान्यांचे किट तसेच सलून व्यवसायिकांना पीपीई किटचे वाटप केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांना, व्यवसायिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या कोरोना संसर्गामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शहरी भागात राहणाऱ्या मुंबईकरांना आपल्या गावाकडील नागरिकांच्या परिस्थितीची जाणीव होऊन आपण त्यांच्यासाठी “एक हात मदतीचा” या उपक्रमातुन गरजू कुटुंबांना मदत करू शकतो ही गोष्ट मनात निर्माण होणे ही एक अभिमानास्पद कामगिरी म्हणावी लागेल.
जय मल्हार मित्रमंडळ, मुंबई या मंडळाने मुंबई येथे गरजूंसाठी दोन वेळा अन्नधान्य किट, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केल्यानंतर आज आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी या मंडळाने कडधे ता. खेड या आपल्या गावी तिसऱ्यांदा गरजूंसाठी आवश्यक अन्नधान्य किट, अंगाचे व कपड्यांचे साबण, मास्क आणि गावातील सलून व्यवसायिकांना पीपीई किटचे वाटप केले. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. शांताराम नाईकडे, सल्लागार श्री. दत्तात्रय धुमाळ, सचिव श्री. बाळासाहेब नाईकडे, खजिनदार श्री. गोविंद गोपाळे, ईश्वर देवदरे, सचिन नाईकडे व इतर कार्येकर्ते उपस्थित होते.