मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत दि. 27, 28 व 29 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मांडायच्या भूमिकेबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.
न्यायालयीन प्रकरणांच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी माहिती घेऊन पुढील रणनितीबाबत विचारविनिमय करुन सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, समितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार संभाजी राजे छत्रपती, आमदार भाई जगताप, विनायक मेटे, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह न्यायालयात शासनाची बाजू मांडणारे विधीज्ञ उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या लढ्याशी संबंधित असलेले विविध मान्यवरही यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे व उपसमिती अध्यक्ष श्री. चव्हाण यांनी त्यांच्याकडून आरक्षण प्रश्नावर त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच सुनावणीसंदर्भातील त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात उपस्थितांशी चर्चा केली तसेच पुढील कामकाजासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या.