किसान सभेच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात आंदोलने
महाबुलेटीन न्यूज / अविनाश घोलप
घोडेगाव : दुध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे किसान सभेच्या नेतृत्वातून आंदोलने करण्यात आली. दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू झाले. याचाच भाग म्हणून पुणे जिल्हा अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यात व पुणे शहरात आंदोलन करण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर व मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घातला, तर पुणे शहरात निवारा वृद्धाश्रम येथे मोफत दुधाचे वितरण येथील जेष्ठ नागरिकांना करण्यात आले. दूध आंदोलनातील हा एक नवा पायंडा संघटनेने या आंदोलनाने घालून दिला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाथा शिंगाडे, जेष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, वसंत पवार, जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मोहन पोटे, अमोद गरुड, अशोक पेकारी, संतोष कांबळे, विश्वनाथ निगळे, डी. वाय. एफ. आय. संघटनेचे गणेश दराडे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या अपर्णा दराडे यांनी केले होते.
आंदोलनातील मुख्य मागण्या :-
- दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा.
- २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा.
- जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा.
- आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्या.
या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलै पासून राज्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा १ ऑगस्ट रोजी पार पडला. शासनाने मागण्या मान्य न केल्यास हे आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचे जिल्ह्याचे सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी सांगितले.