पदवीधर संघटनेचे कार्य कौतुकास्पद : आमदार दिलीपराव मोहिते पाटील ● खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेकडून कोविड सेंटरला ऑक्सिजन निर्मिती मशीनचे संच प्रदान
पदवीधर संघटनेचे कार्य कौतुकास्पद : आमदार दिलीपराव मोहिते पाटील
खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेकडून कोविड सेंटरला ऑक्सिजन निर्मिती मशीनचे संच प्रदान
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेकडून चाकण एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील कोव्हीड सेंटरला प्रत्येकी ७ लिटर ऑक्सिजन निर्मिती क्षमता असलेले ५ ऑक्सिजन निर्मिती मशीन व राजगुरूनगर येथील मुंबई बालसंगोपन केंद्राला एक ऑक्सीजन निर्मिती मशीन संच असे एकूण सव्वातीन लक्ष किंमतीचे ६ मशीन संच आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रदान व लोकार्पण करण्यात आले. शिक्षक ज्ञानदाना बरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे बहुमोल कार्य करतात, हा संदेश समाजाला दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका आहे, यासाठी मुलांना ऍडमिट करण्यापूर्वी ऑक्सिजनची गरज भासू शकते. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन कॉनसेंटर मशीन कोरोना बाधीत बालकांसाठी संजीवनी ठरू शकते. या उद्देशाने आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने सहा ऑक्सिजन पुरवठा संच कोविड सेंटर महाळुंगे इंगळे व मुंबई बालसंगोपन केंद्र राजगुरुनगर या ठिकाणी प्रदान करण्यात आले. महिनाभरापूर्वी तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी यांनी जमा केलेल्या कोविड 19 प्रादुर्भाव रोखणे कामी निधीचा प्रामाणिकपणे योग्य विनियोग जबाबदारी पदवीधर संघटनेने स्वीकारली व तालुक्यातील सर्व कोव्हीड सेंटरला प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन या निधीतून कोणती गरजू वस्तू भेट देता येईल याची माहिती घेतली.
महाळुंगे कोविड सेंटरमधून गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील हजारो कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची गरज व मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्या तुलनेत सेंटरला मर्यादित पुरवठा होतोय याची माहिती मिळाली. त्यानुसार आज महाळुंगे इंगळे कोव्हीड सेंटरला ऑक्सीजन निर्मिती मशीन संच आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले व त्यांच्या हस्ते तो कोव्हीड सेंटरमध्ये कार्यान्वित करण्यात आला.
यावेळी आमदार मोहिते यांनी या उपक्रमाचे, खेड तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू-भगिनींचे व पदवीधर संघटनेचे भरभरून कौतुक केले. काळाची पावले ओळखून तिसऱ्या लाटेसाठी लहान मुलांसाठी कोविडला प्रतिकार करणारे अत्यावश्यक असणारे ऑक्सीजन मशीन संच कवचकुंडले ठरणार आहेत, असे गौरव उद्गार आमदार मोहिते यांनी काढले व सर्वांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, कोविड सेंटरच्या प्रतिनिधी डॉ. अपेक्षा बोरकर, मेडिकल व पॅरामेडिकल कर्मचारी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे, तालुकाध्यक्ष नारायण करपे, महिला आघाडी अध्यक्षा सौ. संजीवनी चिखले, अखिल भारतीय शिक्षक संघाचे अध्यक्ष जालिंदर दिघे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक सदानंद माळशिरसकर, रवीकिरण भोसले, माजी स्थानिक लेखापरीक्षक तृष्णा घुमटकर, प्रसिद्धी प्रमुख सुरेखा ठोके, केंद्रप्रमुख भीमराव पाटील, प्रसिद्धी प्रमुख अशोक सावंत, कार्याध्यक्ष तुकाराम वाटेकर, उपाध्यक्ष कुंडलिक सातकर, कोरोना योद्धे गणेश गोरे, तानाजी खैरे, सुनील धुमाळ, राजेंद्र मोधे आदी उपस्थित होते.
यावेळी खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे यांनी पदवीधर संघटनेच्या सामाजिक कार्याची भूमिका स्पष्ट केली. दोन वर्षांपूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी महापुर ग्रस्तांसाठी संघटनेने खेड तालुक्यातील शिक्षण बांधवांच्या मदतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फर्निचर व शैक्षणिक साहित्यांची अनमोल मदत केली होती. त्याच प्रमाणे वेळोवेळी येणाऱ्या आपत्ती ओळखून पदवीधर शिक्षक संघटना समाजाच्या प्रत्येक सुख दुःखात पुढाकार घेऊन बहुमोल मदत करते. खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या वतीने शिक्षक बंधू भगिनींचे केलेल्या सहकार्याबाबत ऋण व्यक्त करून पुढील काळात तालुक्यातील इतर कोविड सेंटरला मदत करण्याचे स्पष्ट केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक करत शिक्षकांसाठी कोविड सेंटरमध्ये १५ बेड आरक्षित ठेवण्याचे जाहीर केले.
खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या सामाजिक बांधीलकीत सर्व कार्यकारिणी व महिला आघाडी व तसेच ही मोहिम यशस्वी करण्यासाठी शिक्षक बंधू भगिनींची बहुमोल साथ मिळाली. त्याबद्दल तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींचे मनःपूर्वक आभार मानून धन्यवाद देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सल्लागार केंद्रप्रमुख भीमराव पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष नारायण करपे यांनी मानले.
००००