खराबवाडीत वडिलांच्या निधनानंतर स्मृती जतन करण्यासाठी देवकर कुटुंबीयांनी खड्ड्यात अस्थी टाकून केले नारळ व आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण… देवकर कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम
‘अस्थी व रक्षा विसर्जनातून वृक्षसंवर्धन…
वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचे रक्षण…
व दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीचे जतन…’
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील उद्योजक अनिल देवकर, जयसिंग देवकर व संतोष देवकर यांचे वडील, उद्योजक अशोक देवकर, प्रगतशील शेतकरी गणपत देवकर व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे प्रवक्ते, पत्रकार हनुमंत देवकर यांचे बंधू हभप. मारुती उर्फ आबा सोनबा देवकर ( वय ८१ वर्षे ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
आबांच्या स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे प्रवक्ते, पत्रकार हनुमंत देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबीयांनी खड्ड्यात रक्षाविसर्जन करून त्यात नारळ व आंब्याची झाडे ‘स्मृती वृक्ष’ म्हणून लावण्यात आली. देवकर परिवाराने पर्यावरणपूरक उपक्रम राबवून आबांच्या आठवणी जतन केल्या असून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
यावेळी आबांची मुले अनिल देवकर, जयसिंग देवकर, संतोष देवकर, बंधू हनुमंत देवकर, पुतणे सूरज देवकर, सुदर्शन देवकर, नातू कपिल देवकर, ऋषिकेश देवकर, सौरभ देवकर, साहिल देवकर, उद्योजक सुभाष पवार, सूना भाग्यश्री देवकर, वृषाली देवकर, संदीप जोगदंड, तसेच कुटुंबातील सदस्य व नातेवाईक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या संकल्पनेनुसार, देवकर परिवाराने पाणी प्रदूषण रोखण्यासाठी अस्थी विसर्जन नदीपात्रात न करता नारळ व आंब्याची झाडे लावून त्यांच्या स्मृतींचे जतन केले आहे. गावातील व्यक्तीच्या निधनानंतर ‘स्मृती वृक्ष’ लावण्याची परंपरा गावातील ग्रामस्थांनी सातत्याने चालू ठेवली आहे.