काव्यमंच : खेळ ऊन पावसाचा…
खेळ ऊन पावसाचा…!!
——–
खेळ ऊन पावसाचा
अंगा अंगावर माखू,
गर्द हिरव्या रानाचा
सखे रानमेवा चाखू ….!!
खेळ ऊन पावसाचा
ओल्या मातीस भाळतो,
गंध कस्तुरी मृगाचा
तुझ्या वेणीत माळतो …!!
खेळ ऊन पावसाचा
नदी- नाल्यात नाहतो,
तुझ्या गव्हाळी रूपाला
चंद्र चोरून पाहतो …..!!
खेळ ऊन पावसाचा
त्यात भरू चल रंग,
तना-मनात उठू दे
गोड प्रीतीचे तरंग …..!!
खेळ ऊन पावसाचा
गुरा-ढोरांची वळती,
कुंतलाच्या बटातून
थेंब गाली ओघळती …!!
खेळ ऊन पावसाचा
तुझ्या देहावर दंग,
वारा झोंबतो अंगाला
जसा खट्याळ श्रीरंग…!!
खेळ ऊन पावसाचा
त्यात तुझा हात हाती,
मेघ गर्जूनिया यावे
त्यात रूजवूया नाती …!!
©️ प्रकाश बनसोडे, चाकण, पुणे.