काव्यमंच : बैलपोळा विशेष – आज राजा हा पोळ्याचा
🐂आज राजा हा पोळ्याचा🐂
—————–
राजा खराखुरा बैल
बळी राजाच्या मळ्याचा
सण आला सण आला
आज त्याचाही पोळ्याचा॥धृ॥
गळा मानपान देऊ
नव्या घुंगर माळांचा
देऊ श्रावण मासात
घास पुरण पोळ्यांचा ॥१॥
बारा महिन्यात आला
सण त्याचा सोहळ्याचा
शिंगे रंगवून पायी
नाद घुंगरवाळ्याचा॥२॥
शोभिवंत बैल होई
आज एकेक पोळ्याचा
झाला शृंगार पुरता
शोभे राजा हा पोळ्याचा॥३॥
सण त्याचा एक दिन
असा येतो सोहळ्याचा
सर्जा राजा सालभर
आज राजा हा पोळ्याचा॥४॥
— निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
🐂🐂 🐂🐂 🐂🐂