कारगिल युद्धातील शहिद जवानाच्या आठवणी आजही कायम

भुसावळ : सन 1998/99 सालच्या दरम्यान कारगिल युद्ध सुरू झाले होते. त्याकाळात कुऱ्हे ( पानाचे ) येथील राकेश शिंदे हा सैनिक शहीद झाला आहे. त्या शहीद जवानाच्या आठवणी तालुक्यात आजही कायम आहे.
शहीद राकेश शिंदे यांच्या घरची परिस्थिती त्यावेळी अतिशय गरिबीची होती. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. तरीही आई व मोठ्या भाऊ सुरेश उर्फ अन्ना शिंदे व इतर दोन भाऊ मोलमजुरी करून घराचा गाडा ओढत होते. व शहीद राकेश शिंदे यास शिक्षण देऊन मोठे करू, असा आशावाद आईला व मोठ्या भावाचा होता. राकेश यानेही बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर घराच्या परिस्थितीचा विचार करून सैनिक भरती मध्ये जाऊन देशसेवा करण्याचा निश्चय केला व 1995 साली 17 मराठा बटालियन मध्ये सैनिक म्हणून भरती झाले. सैनिक म्हणून भरती झाल्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षातच राकेश शिंदे यास कारगीलच्या सामना करावा लागला. तरीही मोठ्या हिमतीने कारगील मध्ये त्यांनी कर्तव्य बजावले.
सुट्टी मध्ये सीमेवरील गोष्टी ऐकून अंगाला यायचे शहारे
राकेश शिंदे हा सैनिक भरतीत गेल्यानंतर सीमेवर घडत असलेल्या घटनांचे घरी आल्यानंतर सुट्ट्यांमध्ये घरच्यांना माहिती देत होता. यावेळी सर्वांच्या अंगावर शहारे येत होते, असे शहीद शिंदे यांची आई अनुसयाबाई शिंदे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एक वेळेस बंदुकीच्या गोळ्या दोन्ही पायातून गेल्याची आठवण त्यांनी सांगितली होती. ती आजही ही स्मरणात असल्याचे त्यांनी सांगितले.
चार वर्षे 10 महिने केली देश सेवा
शहीद राकेश शिंदे 1995 साली सैन्यात भरती झाल्यानंतर कारगिल युद्धामध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी युद्ध संपले. नंतर किरकोळ दिवसाच्या सुट्टीवर घरी आला. त्यानंतर पुन्हा सीमा रक्षक म्हणून काश्मीर येथील कुंजू या ठिकाणी सेवा बजावत होता. 27 फेब्रुवारी 2000 साली सेवा बजावत असताना तो शहीद झाला. त्यावेळी गावावर शोककळा पसरली. मात्र गावातील तरुण देशासाठी शहीद झाल्यामुळे तरुणांमध्ये उत्स्फूर्त उत्साह निर्माण झाल्याचेही त्यावेळी दिसून आले होते.
भुसावळ येथे उभारण्यात आले पहिले स्मारक
दरम्यान , राकेश शिंदे शहीद झाल्यानंतर त्यावेळी तत्कालीन माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांनी 2001 सारी तत्कालीन नगराध्यक्ष रेखा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नाहाटा चौफुलीजवळ स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. व त्याचवेळी या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे. हे स्मारक आजही कुऱ्हे ( पानाचे ) गावासह परिसरातील तरुणांना प्रेरणा देत असल्याचे दिसून येत आहे.
पेट्रोल पंपाचा प्रस्ताव अद्यापही शासन दरबारी
शासनाकडून विविध योजना मिळाल्या. मात्र त्यावेळी केंद्रसरकारने शहीद जवानाच्या परिवाराला किंवा वारसाला पेट्रोल पंप देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी आईच्या नावाने पेट्रोल पंपाचा प्रस्ताव पाठवला. मात्र आईच्या जन्मतारखेचा दाखला मिळाला नाही. त्यामुळे अद्यापही प्रस्ताव रखडून पडलेला आहे, अशी खंत शहीद राकेश शिंदेच्या आईने व्यक्त केली आहे.