जे. डी. सरांबद्दल आदर आणि भीतीही…
जे. डी. सरांबद्दल आदर आणि भीतीही…
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
डॉ. जे. डी. टाकळकर, प्राचार्य, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर…
सरांची ती केबिन. त्या केबिनमधील तो प्रसंग. मला वर्गात शिपाई बोलवायला आला. त्यानुसार प्राचार्य सरांच्या केबिनमध्ये मी गेलो. माझे वडील सरांसमोर बसले होते. वडील खुर्चीत बसलेले आहे हे पाहून मीही खुर्चीत बसलो. त्या क्षणी प्राचार्य जे. डी. सर कडाडले… “ऊठ, उभा राहा, तू विद्यार्थी आहेस, तुला बसायला सांगितलं होतं का? तुझे वडील बसले म्हणून तू त्यांच्या शेजारी खुर्चीत बसतोस ?”….
सरांच्या निधनाची बातमी कळाली… अन सरांची ती पहिली भेट आणि कर्णभेदी शब्द आठवले…. बातमीने मन खिन्न झाले. डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. “भीती आणि आदर यांचे रूप म्हणजे प्राचार्य डॉ. जे. डी. टाकळकर सर..!”
केबिनमध्ये मी पोहचल्यानंतर सरांनी मला वापरलेले ते पहिले शब्द… आमच्यातील तो पहिला एकतर्फी संवाद… संवाद कसला तो! ते तर होतं झापणे! पण सरांचा राग नाही आला. उलटपक्षी बापासमोर मला त्यांनी झापले ते त्यांचा आदर वाढवून गेले. मला आठवतंय, मी खुर्चीतून खाडकन उभा राहिलो खाली मान घालून… आणि त्यानंतर वडिलांची व त्यांची चर्चा सुरू झाली. शैक्षणिक प्रगती आणि इतर बाबतीत माझ्या विषयी ती चर्चा झाली. तोपर्यंत मी मान खाली घालून उभा होतो. माझं आय टी इंजिनिअर व्हायचं स्वप्नं असल्याने मला अकरावी व बारावी सायन्स मध्ये ‘Computer Science’ हा विषय घ्यायचा होता. त्यासाठी फी भरायची होती, वडिलांनी आर्थिक परिस्थितीनुसार शैक्षणिक फी बद्दल टप्प्याटप्प्याने देऊ अशी विनंती केली.
माझा शैक्षणिक आलेख पाहून जेडी सरांनी ही फी हप्त्याने भरण्याची परवानगी दिली. ते पुन्हा माझ्याकडे पाहून कडाडले, “बाप कष्ट करतो. मात्र कष्टाचं चीज झालं पाहिजे. तुला फी भरण्यास मुदत दिलेली आहे. मला तुझ्याकडून उत्तम विद्यार्थी बनून चांगला रिझल्ट पाहिजे.”असे त्यांनी सुनावले, आणि जा वर्गात बस, असे आदेश दिले. मी निमूटपणे खाली मान घालून वर्गाकडे फिरलो. ही त्यांची व माझी झालेली पहिली पंधरा मिनिटांची भेट आजही लक्षात आहे. आणि त्यांचे ते वाक्य मी शेवटपर्यंत विसरलो नाही. मनाशी खूणगाठ बांधली आणि अखेर मी आय टी इंजिनिअर झालो. सायबर सिक्युरिटी क्षेत्रात करियर केले. NII सारख्या नामांकित कंपनीत दुबईमध्ये नोकरी केली. सरांच्या एका वाक्यामुळे मी घडलो, स्वतःच्या पायावर उभा राहिलो, आजमितीला दरमहा सहा अंकी पगार मिळवू लागलो. त्यावेळी सर मला दरडावले म्हणून माझे करियर झाले…
सर गेल्याचे कळले.. आणि काळजात चर्र झाले. अनेक शिक्षक, प्राध्यापकांच्या हाताखाली शिकलो. त्यातले मोजके लक्षात राहिले. त्यातही डॉ जेडी टाकळकर सरांसारखे प्राध्यापक, प्राचार्य यांचा दबदबा, आदरयुक्त भीती मनात कायम राहिली. सरांचा कॉलेजमधील वावर दिमाखदार हसायचा. न बोलताही त्यांच्या कटाक्षाने गर्भगळीत व्हायचो आम्ही..! अशा सरांचा सहवास काही काळ लाभला. सरांच्या निधनाची बातमी अचानक कळाली अन स्मृतीपटलावर कित्येक वर्षापूर्वी घडलेल्या या प्रसंगाची आठवण झाली. सर, तुम्ही गेलात मात्र आठवणींच्या रूपाने आजही तुम्ही आमच्या मनात आहात. अश्रूंची ही श्रद्धांजली तुमच्या पर्यंत पोहोचेन. सर, तसे लवकरच तास संपवलात….
– अजिंक्य हनुमंत देवकर ( चाकण )
Cyber Security Consultant ( TATA Technologies )
————————