इंग्रजी गरजेची असताना मराठीकडे दुर्लक्ष होता कामा नये : शरद पवार
इंग्रजी गरजेची असताना मराठीकडे दुर्लक्ष होता कामा नये : शरद पवार
महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : “इंग्लिश मिडीयम स्कुल सुरू करताना माता, मातृभाषा याकडे दुर्लक्ष करता कामा नये, मातेचा सन्मान झाला पाहिजे. या तालुक्याने संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी योगदान दिले आहे. इंग्रजी गरजेची असताना मराठीकडे दुर्लक्ष होता कामा नये.” असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री, खासदार शरद पवार यांनी केले. चाकण येथील राजर्षी श्री शाहू प्रतिष्ठान संचालित ग्लाडिओलस इंग्लिश मेडियम स्कुलच्या इमारतीचे उदघाटन व माजी आमदार ऍड. राम कांडगे लिखित ‘हमालाचा पोरगा’ या आत्मकथनपर ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, “या भागाचा चेहरा बदलण्यासाठी अनेकांनी काम केले. पाऊस पडला तर शेती; नाहीतर दुष्काळाची परिस्थिती, पंजाब सारखं राज्य शेती क्षेत्रात पुढं गेलं, तिथं ९० टक्के शेतकरी शेती करतोय. चाकणला आल्यानंतर बांधलेल्या रस्त्याचा प्रश्न महत्वाचा आहे, हे लक्षात येते. येथे कारखानदारी आहे, बाहेरच्या राज्यातील लोक इथे येतात, शेजारी जुन्नर व आंबेगाव तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज काढली. इथल्या सगळ्या उद्योगांना सोबत घेऊन औद्योगिक शिक्षण देता येईल, याचा विचार करावा लागेल. बैलगाडा सुरू करण्यासाठी जेवढा प्रयत्न सर्व पक्षांनी केला तेवढा प्रयत्न पुढची पिढी शिक्षित करण्याकडे लक्ष द्यावे.” असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “राम कांडगे यांनी लिहिलेल्या पुस्तकात सामान्य कुटुंबातील माणूस ते आमदार हा प्रवास मांडला आहे. राम कांडगे यांनी कांद्याचे प्रश्न, धरणाचे व शेतीचे प्रश्न, शेतमालाचे प्रश्न विधिमंडळातून मांडले. कांडगे यांचा मुलगा राजेश याने शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकले हे उल्लेखनीय आहे.” त्यांनी शाळेच्या प्रतिष्ठानला राजर्षी शाहू महाराजांचे नाव दिल्याबद्दल विशेष कौतुक केले.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, एक आदर्श स्कुल म्हणून या शाळेचा नावलौकिक होईल अशी अपेक्षा आहे. आमदार मोहिते यांनी काही प्रश्न मांडले, या परिसरात औद्योगिकरणामुळे गुन्हेगारी वाढली तर, उद्योजक या परिसरात यायचे की नाही याचा विचार करतील, यासाठी मी पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत. बैलगाडा सुरू झाला असला तरी तरुणांनी आपल्या शिक्षण व कुटुंबाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून पुढची पिढी निर्माण होईल. चाकणला सव्वादोन किलोमीटर उड्डाणपूल होणार आहे. त्यासाठी नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. चाकण आयडियल टाऊनशीप करावे लागेल. इंद्रायणी मेडिसिटी अद्ययावत हॉस्पिटल सुरू करणार आहोत. पुणे व पिंपरी चिंचवड नंतर चाकण हे पर्यायी शहर म्हणून विचार करावा लागेल. पुणे-नासिक रेल्वे मार्गही होणार आहे. भारताचे ऑटो हब झाल्यानंतर हिंजवडी व मगरपट्टा नंतर चाकण परिसरात सॉफ्टवेअर आयटी हब करण्यासाठी मागणी केली.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, आपला तालुका मागासलेला आहे असे म्हणायला काय हरकत नाही, कारण इथे बकालपणा वाढला आहे. खेड तालुक्यात बाबा कल्याणी यांच्या माध्यमातून आयटीआय सुरू केले. याठिकाणी बकालपणा वाढला, कचरा समस्या, नद्यांचे प्रदूषण वाढले, शेती अडचणीत आली, शेती ओस पडू लागली, एकीकडे प्रगती होत असताना दुसरीकडे अधोगती होत गेली. माथाडीच्या माध्यमातून औद्योगिक परिसरात गुंडगिरी वाढली. कचरा व सांडपाण्याच्या समस्या कायम आहेत. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील रस्ते औद्योगिक कंपन्यांच्या सीएसआर फंडातून करावेत. आमचे प्रश्न कायम आहेत. तीन धरणे असूनही आम्हाला पाणी वापरायला मिळत नाही. ही शोकांतिका आहे. यावर तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करावी,” अशी माझी विनंती आहे.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार रामभाऊ कांडगे, कमलताई ढोले, कृष्णराव भेगडे, सूर्यकांत पलांडे, विलास लांडे, संभाजी कुंजीर, जगन्नाथ शेवाळे, जयदेव गायकवाड, दिलीप ढमढेरे, हेमलता कांडगे, पंचायत समिती सभापती अरुण चौधरी, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, तालुकाध्यक्षा संध्याताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार पवार यांच्या हस्ते शाळेसाठी जागा देणारे सौ व श्री नानाभाऊ बाबुराव जाधव दाम्पत्य, आर्किटेक्चर मिलिंद पांचाळ, कुशल हेगडे, अनिताताई कांबळे, संतोष वाव्हळ, पवार साहेबांचे तैलचित्र बनविणारे चेतन कडूसकर यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. राजेश कांडगे प्रास्ताविक करताना म्हणाले, “शिरूरच्या जाहीर सभेत माजी आमदार रामभाऊ कांडगे यांच्या मागणीवरून शरद पवार साहेबांनी चाकणची एमआयडीसी जाहीर केली. आणि चाकणचा कायापालट झाला.
सूर्यकांत मुंगसे यांनी सूत्रसंचालन केले, तर संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू कड यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
००००