हाथरस सामूहिक बलात्कार घटनेचा आंबेगाव तालुक्यात तीव्र निषेध
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग, युगप्रवर्तक प्रतिष्ठाण, परिवर्तन प्रतिष्ठाण, भीमशक्ती संघटना, प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार ट्रस्ट यांच्यावतीने उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील चंदपा गावातील मुलीवर १४ सप्टेंबर २०२० रोजी सामूहिक बलात्कार करून बेदम मारहाण करण्यात आली व तिची जीभ कापण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
हाथरस येथील घटना मानवजातीला कलंकित करणारी आहे. पीडित मुलीचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्या मुलीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेशातील सरकार हे जनतेवर अन्याय, अत्याचार करणारे सरकार आहे. अशा जातीयवादी सरकारचा जाहीर निषेध आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग, युगप्रवर्तक प्रतिष्ठान, परिवर्तन प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटना, प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आला.
त्याबाबतचे निषेध निवेदन युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात यांच्या हस्ते आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी यांना देण्यात आले. यावेळी परिवर्तनचे अध्यक्ष दयानंद मोरे, प्रबुद्ध प्रेरणा ट्रस्टचे कार्याध्यक्ष आनंद साळवे, सचिन शिंदे, पवन शिंदे, संजय सरवदे, दत्ता साळवे, श्रीधर देठे आदी उपस्थित होते.