Tuesday, July 15, 2025
Latest:
महाराष्ट्रशैक्षणिक

ग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे :
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्यावत करण्यात येणार आहे तसेच राज्यातील शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्व अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय शासकीय विभागीय ग्रंथालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गाडगे महाराज अकुल धर्मशाळा सोमवार पेठ येथे आयोजित राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या अर्थसाहयाच्या विविध योजना विषयी माहिती देण्यासाठी दोन दिवशीय विभागस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री पाटील बोलत होते.

कार्यक्रमाला संचालक उच्च शिक्षण शैलेंद्र देवळाणकर राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ताचे महासंचालक प्रा. अजय प्रतापसिंह, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माजी ग्रंथालय संचालक किरण धांडोरे,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, प्रमुख कार्यवाहक सोपानराव पवार, कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, भीमराव पाटील, विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते, ग्रंथमित्र रमेश सुतार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री पाटील म्हणाले, समाज माध्यमांच्या युगात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असून शासकीय व खाजगी ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन करून वाचकांना ऑनलाइन पुस्तके उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ग्रंथालयांचे अनुदान वाढवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ११,१५० ग्रंथालये कार्यरत असून ग्रंथालयाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी संगणकीय प्रणाली द्वारे ग्रंथांचे आद्यवतीकरण कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. सांताक्रुज कलिना कॅम्पस येथे राज्याचे शिखर ग्रंथालय राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची अतिशय देखणी इमारत तयार होत असून, या ठिकाणी सुद्धा वाचकांसाठी पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खासदार व आमदार निधीतून काही पुस्तक खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले.

ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहयाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री श्री पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकात श्री गाडेकर म्हणाले, ग्रंथालय आधुनिक झाली पाहिजे यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे. शासकीय ग्रंथालयाप्रमाणे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात सुद्धा आज्ञावलीत ग्रंथांची नोंद घेण्याचे काम सुरू करत आहोत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या व एकूणच त्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान व ग्रंथालय संचालनालय यांच्या अर्थसाहयाच्या विविध योजनांविषयीची माहिती पुणे विभागातील सर्व शासन मान्य ग्रंथालयांना व्हावी या उद्देशाने, दोन दिवशीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. असे ते म्हणाले.

या दोन दिवशी कार्यशाळेत शासनमान्य ग्रंथालयातील कामकाजासंदर्भात चर्चा करण्यात येणार असून अनेक मान्यवर वक्त्यांचे विविध विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथ मित्र दिलीप भिकुले व सहाय्य्क ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल सुरेश रिद्धीवाडे यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, निरीक्षक श्रीकांत संगेपांग, अपर्णा वाईकर, अमित सोनवणे, श्रीनिवास मंगलपल्ली यांच्यासह ग्रंथमित्र धोंडीबा सुतार, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे मोहन महाराज शिंदे, उपाध्यक्ष हनुमंत देवकर, कोल्हापूरचे डॉ. सुशांत मगदूम आदीसह विभागातील सर्व जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!