घरात घुसून चोरट्यांनी १ लाख ७० हजारांचे दागिने केले लंपास
महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : शिनोली ता. आंबेगाव येथील एका उघड्या घरात शिरून अज्ञात चोरट्यांनी बंद कपाटाचे लॉक उघडून कपाटातील सुमारे १ लाख ७० हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याची फिर्याद नलिनी शंकर बोऱ्हाडे यांनी घोडेगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नलिनी बोऱ्हाडे यांनी कपाटात २८/०८/२०२० रोजी दागिने ठेवले होते. कपाटाची एक चावी त्यांच्याकडे व दुसरी चावी मुलाकडे होती. त्यानंतर काही दिवसानंतर फिर्यादीची एक चावी हरवली होती. फिर्यादीला पैशांची गरज भासल्याने २४/०९/२०२० रोजी दुसरी चावी मुलाकडुन आणून कपाट उघडले असता कपाटात दागिने सापडले नाही. याबाबत त्यांनी पती व मुलाला विचारले असता त्यांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यांनी घरात दागिन्यांची शोधाशोध केली असता दागिने सापडले नाहीत. अडीच तोळ्याचे ५० हजार किंमतीचे मणी मंगळसूत्र, सव्वा तीन तोळ्याची ९० हजार किंमतीची सोन्याची माळ, अर्धा तोळ्याची १५ हजार किंमतीची सोन्याची चैन व १५ हजार किंमतीचे छोटे मंगळसूत्र असे एकूण १ लाख ७० हजार किंमतीचे दागिने उघड्या घरातून अज्ञात चोरट्यांनी कुठल्यातरी चावीने कपाट उघडून चोरून नेले असल्याची फिर्याद नलिनी शंकर बोऱ्हाडे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलिस स्टेशन करत आहे.