दिवाळीचा बाजारहाट करून घरी परतणाऱ्या मायलेकीच्या दुचाकीला कंटेनरची धडक, आई जागीच ठार, मुलगी बचावली
वाहन चालकावर गुन्हा दाखल, कंटेनरचालकास अटक
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : दिवाळीचा बाजारहाट करून परतणाऱ्या
मायलेकींच्या दुचाकी मोपेडला ओव्हरटेक करणाऱ्या कंटेनरची धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरखाली सापडून दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली.
सुदैवाने यात त्यांची मुलगी बचावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी (दि.८) दुपारी साडेतीनच्या सुमारास तळेगाव स्टेशन चौकाजवळ झाला. कंटेनरचालकास अटक करण्यात आली आहे.
कालिंदा संतोष तोरकडे (वय ३७, रा. इको व्हॅली हौसिंग सोसायटी, कान्हे फाटा, मूळ रा.पटेलनगर, लातूर) असे अपघात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
या संदर्भात त्यांची मुलगी देविका संतोष तोरकडे (वय २०, रा. इको व्हॅली हौसिंग सोसायटी, कान्हे फाटा, मावळ ) यांनी येथील पोलीस ठाण्यात कंटेनर चालका विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक के. एस. गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालिंदा आणि संतोषी या मायलेकी तळेगाव दाभाडे येथून दिवाळीचा बाजारहाट करून दुचाकीवरून (क्रमांक एम. एच. २४ ए एन ६४३४) घरी परतत असताना वडगावच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची (क्रमांक एच. आर. ५५ वाय ७६४२) त्यांच्या दुचाकीस धडक बसली. देविका दुचाकी चालवत होती.
यामध्ये देविका दुचाकीच्या पुढे तर आई दुचाकीच्या मागील बाजूस पडल्या. या विचित्र अपघातात कालिंदा यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर देविका ही महाविद्यालयीन युवती या अपघातातून सुदैवाने बचावली. कंटेनर चालक रवी कमल सिंग याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. एस. गवारी करीत आहेत.