बायकोच्या गळ्यातील मनी मंगळसुञ विकुन खत, बी आनलं व्हतं…शेतकऱ्याची कैफियत
हताश शेतकऱ्याने सोयाबीन पिकांवर फिरवला नांगर…. दुबार पेरणी करुनही सोयाबीन उगवलं न्हाय…
महाबुलेटीन नेटवर्क / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची पेरणी केली. कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाच कशीबशी पेरणी करून शेतकऱ्यांनी उद्याचे स्वप्न बघत पिकांची लागवड केली. मात्र शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील शेतकरी सतिष शिवराजप्पा सिंदाळकर यांनी एकदा नव्हे तर दोनदा सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या या शेतकऱ्याने सोयाबीन पिकावरच नांगर फिरवल्याची घटना येरोळ येथे घडली. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लगबगीने लागवड केली. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून कशीबशी शेती केली. कोरोना महामारीचे भयानक संकट उभे असतानाही रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस पडल्याने येरोळ येथील शेतकरी सतिष सिंदाळकर यांनी उदगीर येथील कृषी सेवा केंद्रातुन महाबीज जेएस ३३५ सोयाबीनची आठ बॅग खरेदी करूण पेरणी केली. मात्र त्यानंतर दहा-बारा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांची पेरणी करूनही उगवले नसल्याने त्यांनी पुन्हा घरगुती सोयाबीनची पेरणी केली. मात्र तेही बियाणे उगवले नाही. शेवटी हताश होऊन शेतकरी सतिस सिंदाळकर यांनी सोयाबीन पिकावर नांगर फिरविले. संदिप शंकर पाटील व शंकर शेषेराव वाघमारे व हानमंतवाडी येथील विद्याधर हरीराम माडजे, आमर प्रभु माडजे, भाऊसाहेब माडजे, लहू काशिनाथ बिरादार डिगोळ या शेतकऱ्यांचेही नामंकित कंपनीचे सोयाबीन बियाणे दोनदा पेरणी करूनही उगवले नसल्याने ते हताश झाले आहेत.
“बायकोच मगंळसुञ विकल अन् खत बी आणलं…गेल्यावर्षी अतीवृष्टीने मारलं … हाती आलेलं पिक परतीच्या पावसान गेलं… जवळचं सर्व संपल्यामुळे बायकोच मगंळसुञ विकुन बाजारातुन खत अन बी आनलं ते पण उगवल नाय, एकदा नव्ह, दुबार पेरणी केली तेपण उगवलं नाय, आता तिबार पेरणी कशी करावी ? हा प्रश्न झोप येवु देत नाही” असं हानमंतवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी विद्याधर हरिराम माडजे यांनी डोळ्यात पाणी आनुन महाबुलेटीन च्या प्रतिनिधीला सांगितलं.
कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी…
शिरूरअनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बहुतांश सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. येरोळ येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नामकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहे, अशी माहिती शिरूरअनंतपाळ पं. स. चे तालुका कृषी अधिकारी साहेबराव आडे व तालुका कृषी अधिकारी एस. बी. सोनवर यांनी दिली.