धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न, पतसंस्थेच्या निमंत्रित संचालकपदी युवा उद्योजक आदित्य टकले यांची नियुक्ती
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या तळेगाव दाभाडे येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पतसंस्थेच्या कार्यालयात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले, अध्यक्ष विजय शेटे, सचिव विनोद टकले, संचालक अमर (जितू) खळदे, आदित्य टकले, व्यवस्थापिका सुनीता शेंडे, वसुली अधिकारी विकास धामणकर, संजना जाधव, गीता ठुबे आदी उपस्थित होते.
विनोद टकले म्हणाले, या कालदर्शिकेमध्ये पतसंस्थेची सांपत्तिकस्थिती व आकर्षक ठेव योजना प्रकाशित केलेल्या आहेत. तसेच सर्व संचालक मंडळ, कर्मचारीवर्ग व बचत प्रतिनिधी यांचे वाढदिवस साजरे करण्याचा हेतू साध्य झालेला आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून पतसंस्था समाजहीत जोपासत असून त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.
‘खंडूजी टकले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य संचालकांना सोबत घेऊन पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. टीमवर्क उत्तम आहे. संस्था स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ ‘ मिळणे ही बाब पतसंस्थेच्या दृष्टीने गौरवाची आहे’, असे प्रतिपादन विजय शेटे यांनी केले.
खंडूजी टकले म्हणाले, सभासदांचे हीत जोपासणे आणि त्यांची आर्थिक पत उंचावणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पतसंस्थेचा कारभार पारदर्शी आहे. ‘माझे कुटुंब माझी पतसंस्था’ या दृष्टीने सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी काम करीत आहेत. कोरोना काळातील लॉकडाऊनच्या परिस्थितीतही सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात आला आहे.
दरम्यान, आदित्य खंडूजी टकले यांची पतसंस्थेच्या निमंत्रित संचालकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आदित्य टकले म्हणाले, कमी वयात मला पतसंस्थेवर काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.
संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास ठेऊन संस्थेत काम करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी संचालक मंडळाचा आभारी आहे. विनोद टकले यांनी आभार मानले.