Thursday, April 17, 2025
Latest:
आदिवासीआरक्षणखेडपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

धनगरांचा आदिवासी मध्ये समावेश नको, अन्यथा जनआंदोलन उभारू : राष्ट्रीय बिरसा ब्रिगेड व आदिवासी विचार मंचचा इशारा

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी

वाडा ( पुणे ) : धनगर जातीला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये; अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलने केली जातील, असा इशारा बिरसा ब्रिगेड व आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी खेड विक्रांत चव्हाण व तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या मार्फत निवेदनाद्वारे दिला.

महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीत ५५ जाती घुसखोरी करू पाहत आहेत, त्यात राज्यातील धनगर समाज आग्रही आहे. धनगर समाज न्यायालयीन व संविधानिक मार्गाने कधीही अनुसूचित जमातीत घूसू शकत नाही, याची धनगर नेत्यांना जानीव असून त्यांनी नवाच जावईशोध लावून धनगर हेच धनगड आहेत आणि म्हणून आम्हाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावं, असं वेळोवेळी दबाव तंत्राचा वापर करून सांगितलं जातं. परंतु महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती यादीत धनगर व धनगड या दोन्ही जातींचा समावेश नसून राज्याच्या ३६ व्या क्रमांकावर असलेली जमात ही ओरान धांगड (Dhangad) असून धनगर व ओरान धांगड यांचा कोणताही सांस्कृतिक, सामाजिक, पारंपारिक, प्रादेशिक संबंध येत नाही. राज्यातील काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधी वोटर बँक म्हणून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सुचित घुसवण्याचा असंविधानिक मागणीचा पाठपुरावा करताना दिसत आहे. पण महाराष्ट्र शासनाने १२ जून १९७९ ला धनगर समाजाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. यावर संबंधित विभागात सखोल चर्चा करून धनगर समाज आदिवासींचे कोणतेही निकष पूर्ण करू शकत नसल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये सदरचा प्रस्ताव मागे घेतला. तसेच १२ जुलै २००५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतींनी खास बैठक घेऊन धनगरांच्या प्रश्नावर चर्चा केली.

धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यात येईल का? याकरिता राज्य सरकारच्या वतीने संशोधन पथक तयार करून २००६ साली एप्रिल महिन्यात ज्या राज्यात धांगड ही आदिवासी जमात आहे, त्यापैकी बिहार, ओरिसा व झारखंड राज्यात पाठवण्यात आले. या संशोधन पथकाने १ जून २००६ रोजी आपला अहवाल सादर केला. त्यात असे नमूद केले की, ओरान धांगड जमाती आणि धनगर भिन्न आहेत. धनगर ही जात आहे, जमात नाही. तसेच मागील तीनशे वर्षाचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की, आदिवासी आणि धनगर हे दोन भिन्न समाज आहेत.

जनआंदोलनाचा इशारा : इतिहासकारांनी मल्हारराव होळकर व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्ष व लढाईला कुठेही आदिवासींचा संघर्ष व लढाई असे म्हटले नाही. देशात १९११ पासून झालेल्या जनगणनेत धनगर समाजाची जाती अशीच नोंद आढळून येते, जमाती म्हणून नाही, असे अनेक ऐतिहासिक पुरावे बघता धनगर जातीचा आणि आदिवासी समाजाचा कोणत्याही प्रकारे संस्कृतिक, सामाजिक, खानपान, रितीरिवाज, प्रथा-परंपरा, विधी संस्कार यात सारखेपणा दिसून येत नाही. आदिवासी समाजाला मिळालेले आरक्षण हे सामाजिक आरक्षण असून त्यात कोणीही घुसखोरी करू करू शकत नाही. तरी देखील महाराष्ट्र राज्यात दबावतंत्राला बळी पडून चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम देशातील आदिवासी आरक्षणावर होणार आहे, म्हणून येणाऱ्या काळात आदिवासी समाजाच्या वतीने महाराष्ट्रासह देशातील अकरा राज्यांमध्ये राष्ट्रीय बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आदिवासी जनआंदोलन उभारण्यात येईल.

यावेळी बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष एकनाथ तळपे, सचिव लक्ष्मण मदगे, जिल्हा सचिव आकाश लांघी,अशोक घिगे, प्रताप आडेकर, रामदास भोकटे, शुभम मदगे, नवनाथ मेचकर, दिनेश हांडे, वसंत तळपे, संतोष भांगे, खंडू लांघी, सुदर्शन तिटकारे, शांताराम तळपे, मच्छिन्द्र वनघरे, योगेश शिंगाडे, कन्हैया आढळ, गणपत तळपे, खंडू भांगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!