कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 1 डिसेंबरला होणार पहिलीच निवडणूक
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने ‘कोविडपासून सुरक्षित निवडणूक’ हे ध्येय्य साध्य करण्यासाठी निवडणूक यंत्रणा कटीबद्ध आहे. या निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होईल.
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे नुकतेच पुणे येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव, पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक डॉ. निलीमा केरकेटा, शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर येथील उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उप विभागीय अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी वर्षा लढ्ढा यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
या निवडणुकीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उपायुक्त (सर्वसाधारण) संजयसिंह चव्हाण, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून खादी व ग्रामोद्योगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलीमा केरकेटा या पदवीधर मतदार संघासाठी तर श्रीकांत देशपांडे हे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडतील.