कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करणार : पोलीस निरीक्षक सतीश पवार
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक पाचमध्ये रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. मात्र काही रिक्षाचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देहूरोड – तळेगाव वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिला. तळेगाव स्टेशन येथील वाहतूक नियंत्रण पोलीस चौकीसमोर रिक्षाचालकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी पोलीस हवालदार अनंत रावण, दत्तात्रय हत्ते, चंद्रकांत गावडे, रामदास जयभाये, तळेगाव दाभाडे शहर रिक्षा संघ अंर्तगत असलेल्या गुरुदेव रिक्षा स्टँड, आदर्श रिक्षा स्टँड, जनसेवा रिक्षा स्टँड, जिजामाता रिक्षा स्टँड यांचे पदाधिकारी आणि रिक्षाचालक उपस्थित होते.
यावेळी सतीश पवार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालक आणि मालकांनी स्वतःची आणि प्रवाशांची काळजी घ्यावी. गणवेश परिधान करावा. बॅच बिल्ला परवाना, कागदपत्रे जवळ बाळगावीत. यासंदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अनलॉक पाचमध्ये फिजिकल डिस्टंसिंग ठेवून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली. मात्र, बहुतांशजण गणवेश परिधान करत नाहीत. बॅच बिल्ला व कागदपत्रे जवळ न बाळगता प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून येत आहे. मास्क परिधान करण्यासह सॅनिटायझर ठेवणे व चालक-प्रवासी यांच्यात प्लास्टिकचा पडदा लावणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. चौकांमध्ये रस्त्यावर बेशिस्त रिक्षा उभ्या केलेल्या असतात. अशा बेशिस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. लवकरात लवकर बॅच बिल्ला परवाना, रिक्षाची कागदपत्रे, विमा आदींची पूर्तता करण्यासह रिक्षाचालकांनी स्वच्छ गणवेश परिधान करावेत, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सतीश पवार यांनी दिला.
यावेळी रिक्षाचालक आणि मालकांच्या वतीने दिलीप डोळस, हेमंत वैरागी यांनी मनोगत व्यक्त केले.