कोरोनाच्या काळात सहकार्य न केल्यास बदली भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात : आयुष प्रसाद यांचा इशारा
तळीरामांनो सावधान…. कोरोनाची बाधा झाल्यास जीवन येऊ शकते धोक्यात : सीईओ आयुष प्रसाद
महाबुलेटीन न्यूज / अविनाश घोलप
घोडेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास दारूचे व्यसन असणाऱ्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पोलिस पाटलांना तळीरामांची यादी तयार करून जवळच्या पोलिस ठाण्यात देण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
अवसरी फाटा ( ता. आंबेगाव ) येथे ना. दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत प्रसाद बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आंबेगाव तालुक्यात वेळोवेळी ना. दिलीप वळसे पाटील कोविड आढावा बैठक घेत असल्याकारणांमुळे इतर तालुक्यांच्या तुलनेत कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही प्रमाणात यश मिळालेले दिसत आहे. दारूचे व्यसन, पत्ते व कॅरम खेळणाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या लोकांची कानउघाडणी करून अशा लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत.
आंबेगाव तालुक्यातील ३९ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण मंचर व घोडेगाव मध्ये आढळले आहेत. आरोग्य विभागाने याबाबत रुग्ण वाढू नयेत यासाठी योग्य नियोजन करावे. ना. वळसे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे एका कोरोना बधिताच्या संपर्कातील ३० जणांचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत. त्यांना तंत्रनिकेतन महाविद्यालयात होम क्वारंनटाईन करावे. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेतून अनेक रुग्णांना विविध प्रकारचे उपचार भीमाशंकर व गेटवेल हॉस्पिटलमध्ये मोफत मिळतात. याबाबत प्रशासनाने जनजागृती करावी.
आंबेगाव पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, आंबेगाव तालुक्यात अनेक गावांत तलाठी, ग्रामसेवक फिरकत नाहीत अशी अनेक गावातील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. यावर आयुष प्रसाद यांनी सांगितले की, कामगार तलाठी व ग्रामसेवकांनी गावात हजर राहणे बंधनकारक आहे. कोविड कामात सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग यांना सहभागी करून घ्यावे. या कामात कोणत्याही कर्मचाऱ्याने असहकार दाखविल्यास त्याची बदली भंडारा, गडचिरोली भागात होऊ शकते असेही सांगितले.
“मंचरमध्ये ७० ते ७५ दिवसांपासून लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे व्यापारी व लहानमोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हीच परिस्थिती घोडेगावची देखील आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन बाबत फेरविचार करावा.” अशी मागणी यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केली. यासंदर्भात मंचर व घोडेगावचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश ना. वळसे पाटील यांनी दिले.
आपण ग्रामीण भागातील छान वार्तांकन देत असता.वाचुन चांगली माहिती मिळते. त्या बद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद….