चाकण, आळंदी व राजगुरूनगर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, उलटसुलट चर्चांना उधाण
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील चाकण, आळंदी व राजगुरूनगर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. कोरोनाचा कहर खेड तालुक्यात असताना या बदल्या अचानक झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.
राजगुरूनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची बदली करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. घोलप यांच्या जागी उमरगा नागपरिषदेचे मुख्यधिकारी प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चाकण नगरपरिषदेच्या मुख्यधिकारी डॉ नीलम पाटील यांना देखील त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या जागी गंगाखेड नगरपरिषदेचे नानासाहेब कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आळंदीचे मुख्याधिकारी सागर भूमकर यांची बदली झाल्याने देवाच्या आळंदीत चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या जागेवर वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर परिषदेतील अंकुश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची बदली होऊ नये म्हणून एका राजकीय व्यक्तीने आपले वजन वापरले, मात्र अखेर बदली झालीच. या बाबतचे आदेश अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी दिले आहेत. या अचानक होणाऱ्या नियुक्ती आणि बदल्यांमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.