Sunday, April 20, 2025
Latest:
भोरविशेष

भोर तालुक्यातील कोंढरी गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

महाबुलेटिन नेटवर्क

पुणे  :  पुणे जिल्हयामध्ये भोर तालुक्यातील कोंढरी गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे सांगितले.
भोर तालुक्यातील कोंढरी येथे गत पावसाळयात भूस्खलनाची घटना घडली होती. यादृष्टीने कोंढरी गावची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार अजित पाटील, भोरचे पोलीस निरिक्षक श्री.मोरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे,पंचायत समिती सदस्य रोहन बाठे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोंढरी गावच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी गतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. या गावच्या पुनर्वसनामुळे 40 कुटूंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम थोपटे यांनी आंबेगाव तालुक्यातील माळीण गावच्या धर्तीवर कोंढरी गावचे पुनर्वसन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भोर तालुक्यातील प्रशासनातील विविध विभागांचे विभागप्रमुख, ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर वेल्हा तालुक्यातील अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या घोल गावाची जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पाहणी केली. अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या या गावातील वैद्यकीय सुविधा, रस्ते, विद्युत पुरवठा, दूरसंचार सेवा अशासारख्या मुलभूत सोईसुविधांविषयीच्या अडचणींबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी सरपंच कोंडीराम मोरे यांनी गावातील समस्यांबाबत तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. घोल गावच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले. यावेळी घोल प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!