आळंदीतील दर्शनबारी प्रश्न आणि इंद्रायणी स्वच्छतेचा प्रश्न याबाबत लवकरच मुंबईत बैठक : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी देवाची : “संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आषाढी आणि कार्तिकी यात्रेत वारकरी आणि भाविक भक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रलंबित दर्शन बारीचा सोडवण्यासाठी तसेच पवित्र अशा इंद्रायणीचे पावित्र्य जपण्यासाठी ती स्वच्छ कशी राहील, यासाठी लवकरच एक आढावा बैठक घेतली जाईल.यामध्ये संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, स्थानिक आमदार, खासदार, स्थानिक नगरपालिका प्रतिनिधी यांची मुंबईत बैठक लावून यांच्याशी चर्चा करून हे दोन्ही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे,” असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दिले आहे.
यादरम्यान त्यांनी दर्शन बारी आरक्षनाच्या जागेवर जाऊन तिची पाहणी केली. तसेच भक्ती सोपान पुलावरून इंद्रायणी नदीचे सध्याचे असलेले चित्र पाहून त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत सुध्दा येणारा भाविक इंद्रायणी मध्ये स्नान करत असतो, ती इंद्रायणी प्रदूषण मुक्त व्हावी, या भावनेतून लवकरच संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून तिचं पावित्र्य जोपासले जावे, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरात त्यांनी आळंदी विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा करून आळंदीचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी परभणीचे खासदार संजय जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप,आळंदीच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे पाटील, योगेश देसाई, व्यवस्थापक माऊली वीर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, ह.भ.प.चैतन्य महाराज कबीर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, तुषार घुंडरे, संदीप रासकर, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, आनंद मुंगसे, अशोक कांबळे, काँग्रेसचे नेते संदीप नाईकरे पाटील, भाजपचे नेते संजय घुंडरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, मनसेचे नेते प्रसाद बोराटे उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज दर्शनानंतर त्यांनी ह.भ.प चैतन्य महाराज कबीर यांच्या कबीर मठाला सदिच्छा भेट दिली.