आळंदीत फुटपाथ अतिक्रमण मुक्त ठेवणार : मुख्याधिकारी अंकुश जाधव
महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिंनिधी : आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने आळंदीत मोठी विकास कामे झाली आहेत. यात शहरातील रस्ते प्रशस्त झाले आहेत. प्रमुख मार्गांचे दुतर्फा पदचार्यांसाठी पादचारी मार्ग विकसित करण्यात आले आहेत. शहरातील पादचारी मार्ग या पुढील काळात अतिक्रमण मुक्त राहतील, याची दक्षता घेण्याबाबत सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

आळंदीतील पादचारी मार्गावर कोणीही अतिक्रमण करून बसू नये. यासाठी प्रशासना तर्फे आवाहन करण्यात आले आहे. पादचारी मार्गावर बसलेल्या विक्रेत्यांचे साहित्य, माल जप्त केला जाणार असून ही कार्यवाही नियमित सुरू राहणार आहे. यासाठी कर निरीक्षक रामराव खरात यांचे मार्गदर्शनाखाली व नियंत्रणात पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने मंगळवारी ( दि.२० ऑक्टोबर ) शहरात कारवाई करून शहरातील विविध रस्त्याचे कडेला असलेले पादचारी मार्ग अतिक्रमण मुक्त केले.
नागरिकांना वाढत्या वाहनांच्या वर्दळीने रहदारीला सुरक्षित होण्यासाठी पादचारी मार्ग अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिले. रस्त्यावर होणारी गर्दी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियंत्रित आणण्यास या मोहिमेचा उपयोग होणार असल्याने आलेल्या सूचनांप्रमाणे शहरात कार्यवाही नियमित सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.