आळंदी उपनगराध्यक्षापदी भाजपच्या पारुबाई तापकिर
आळंदी उपनगराध्यक्षा पदी भाजपच्या पारुबाई तापकिर
महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद उपनगराध्यक्षापदी भाजपाच्या पारुबाई तापकिर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केली. या निवडीसाठी आळंदी नगरपरिषदेने ऑनलाइन विशेष सभेचे आयोजन केले होते, अशी माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या प्रसंगी मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगरसेवक सचिन गिलबिले, सागर भोसले, सागर बोरुंदिया, प्रतिमा गोगावले, सुनीता रंधवे, मीरा पाचुंदे, स्मिता रायकर, प्रकाश कु-हाडे, प्रशांत कु-हाडे, स्नेहल कु-हाडे, प्रमिला रहाणे, आदित्य घुंडरे, पारुबाई तापकिर, प्राजक्ता घुंडरे, रुख्मिणी कांबळे यांचेसह नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर उपस्थित होत्या. या सभेस १६ सदस्यांनी भाग घेतला, तर ३ सदस्य गैरहजर होते.
आळंदीचे उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांनी पक्षीय धोरणानुसार या पदावर इतर सदस्याला काम करण्याची संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आळंदी नगरपरिषद ऑनलाइन विशेष सभेत उपाध्यक्ष निवडीसाठी भाजपाच्या नगरसेविका पारुबाई तापकिर यांचा एका जागेसाठी दोन प्रतीत एकमेव अर्ज आल्याने उपाध्यक्षपदी पारुबाई तापकिर यांची बिनविरोध वर्णी लागली.
आळंदीत ठराविक मुदती नंतर इतर पदाधिकारी यांना संधी मिळावी, यासाठी भाजपाच्या सदस्यांचे पदाचे राजीनामास्त्र उपसले जाते. त्याप्रमाणे इतर नगरसेवकांना संधी मिळावी म्हणून उपाध्यक्ष सागर बोरुंदिया यांनी राजीनामा दिला होता. यापूर्वी प्रभाग क्रमांक एक, तीन, पाच, सात या प्रभागतील नगरसेवकांना या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. उर्वरित प्रभागतील नगरसेवकांत संधी मिळावी म्हणून खलबते सुरू होती. प्रभाग क्रमांक तीनला एकाच टर्म मध्ये सलग दुसर्यांदा उपाध्यक्षपदाची संधी बोरुंदिया यांचे रूपाने मिळाली होती. आता प्रभाग क्रमांक ८ अ मधून निवडून आलेल्या भाजपाच्या पारुबाई तापकिर यांनी या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा पारुबाई तपकिर यांचा निवडी नंतर मावळते उपाध्यक्ष सागर बोरुंदिया, नगरध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपस्थित नगरसेवकांचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. काही दिवसांनंतर राजीनामा दिल्यावर पुन्हा इतर सदस्याला संधी देण्यात येणार आहे.
आळंदी नगरपरिषदेची निवडणूक २०२१-२२ डोळ्या समोर ठेवून अजून दोन ते तीन नगरसेवकांना या पदावर संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात होत आहे. अपक्ष नगरसेविका स्मिता रायकर यांना ही भाजपत प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह जिल्हा भाजपचे पदाधिकारी यांनी शब्द दिला होता. याची अनेकांना निवडणुकी दरम्यान आठवण झाली.
यावेळी मावळते उपाध्यक्ष सागर बोरुंदिया म्हणाले, आळंदीला पिण्याचे पाणी लवकर मिळावे म्हणून आपले कार्यकाळात बंदिस्त पाईप लाइन मधून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नलिका टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच आळंदीला भामा आसखेड कुरुळी टॅपिंग ते आळंदी या पाइप लाइन मधून पाणी पुरवठा सुरू होईल. आपल्या काळात हे काम मार्गी लावण्यात आल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात शहरास नियमित पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. नागरिकांसह भाविकांना पुरेशा प्रमाणात उच्च दाबाने पाणी पुरवठा होण्यातील अडथळे दूर करण्यात आले आहेत. भामा आसखेड ते आळंदी बंद पाईप लाईन मधून पाणी पुरवठ्यासाठी नलिकांचे कामास गती देण्यात आल्याचे बोरुंदिया यांनी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी ऑनलाइन विशेष सभेच्या कामकाजाचे नियोजन केले. नवनिर्वाचित उपाध्यक्षा पारुबाई तापकीर यांचे निवडीचे समर्थकांनी स्वागत केले.
००००