आळंदी-पंढरपूर पालखी सोहळा बसने नेण्याची आळंदी ग्रामस्थांची मागणी ● भाविक, वारकरी, स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य
आळंदी-पंढरपूर पालखी सोहळा बसने नेण्याची आळंदी ग्रामस्थांची मागणी
भाविक, वारकरी, स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य
महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे सावट आहे. यामुळे मागील वर्षी झालेल्या चुका टाळून यावर्षीही माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरी बसने आळंदी ते पंढरपूर व्हावा, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी भाविक, वारकरी आणि ग्रामस्थांच्या आरोग्याचे दृष्टीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पुणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त तसेच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना आळंदी ग्रामस्थांचे वतीने माऊली भक्त ज्ञानेश्वर कु-हाडे पाटील यांनी दिले असल्याचे सांगितले.
सन २०२० मध्ये सुरू झालेले कोरोना संकट अजून दूर झालेले नसल्याने यावर्षीही मागील वर्षी प्रमाणे मोजक्याच भाविकांत आळंदी-पंढरपूर पालखी सोहळा नियोजन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षभरात कोरोनाने मोठे संकट लोकांसमोर उभे केले आहे. यात अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अजून पुर्णपणे कोरोना संकट संपलेले नाही. कोरोना गर्दीत जास्त वाढत असल्याने गर्दी नियंत्रित राहावी, यासाठी तसेच पालखी सोहळ्यामुळे कोरोना संकट वाढू नये याची दक्षता म्हणून यावर्षीही शासनाने आळंदी-पंढरपूर पालखी सोहळा बसने मोजक्याच भाविकांत साजरा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील वर्षी कुंभमेळा, पंढरपूर पोट निवडणूक, ग्रामपंचायत निवडणुका तसेच दिल्लीतील धार्मिक कार्यक्रम यामुळे देखील कोरोना महामारी वाढली. हा अनुभव लक्षात घेता यावर्षी पालखी सोहळा कोरोना महामारी संकट अजुन कायम असल्याने शासनाने व्यापक लोक हितासाठी सामाजिक आरोग्याची काळजी घेवून कोरोना महामारी वाढू नये, यासाठी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत बसने पालखी सोहळा साजरा करावा. पायी वारीचा हट्ट सुरू आहे तो सोडावा तसेच संतांची शिकवण, सामाजिक आरोग्य, सलोखा, विश्वशांतीचा विचार करून कोरोना महामारीचे संकट असल्याने याचा विचार करून मागणी करण्यात आली आहे.
सोहळा बसने ये-जा करताना प्रथा परंपरांचे पालन व्हावे, प्रस्थान नंतर व परत वारीहून आल्यानंतर आपआपल्या मंदिरांत धार्मिक कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे करून आषाढी वारी सोहळा मोजक्याच लोकांत शासनाचे कोरोना संदर्भातील नियम, सूचना, आदेशांचे पालन करीत पालखी सोहळा साजरा व्हावा, यासाठी शासनाकडे मागणी निवेदनातून करण्यात आल्याचे आळंदी ग्रामस्थांचे वतीने ज्ञानेश्वर कु-हाडे यांनी सांगितले.
०००००