Friday, May 9, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेषसण-उत्सव

आळंदी माऊली मंदिरात शिंदेशाही पगडी चंदनउटी दर्शन… ● रामनवमी निमित्त श्रीचे राजबिंडे वैभवी रूप साकारले…

आळंदी माऊली मंदिरात शिंदेशाही पगडी चंदनउटी दर्शन
● रामनवमी निमित्त श्रीचे राजबिंडे वैभवी रूप साकारले

महाबुलेटीन न्यूज 
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीचा वापर करून श्रींचे राजबिंडे शिंदेशाही पगडी अवतारातील वैभवी रूप शिल्पकार अभिजीत धोंडफळे यांनी परिश्रम पूर्वक साकारले. श्रीचे लक्षवेधी रूप मात्र मंदिर देवदर्शनास बंद असल्याने थेट प्रक्षेपणाची व्यवस्था संस्थानने केली. यावर्षीही श्रींचे दर्शनास भाविक नागरिकांना कोरोना महामारीचे प्रभावामुळे जाता आले नाही. आळंदी परिसरातील विविध श्री राम मंदिरांत श्री रामजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी मोजक्याच भाविकांत ठिकठिकाणी साजरा झाला. 

माउली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास सुरुवात होते. राम नवमी निमित्त श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, लक्षवेधी पुष्पसजावट करून श्रीचे वैभवी रूप शिल्पकार अभिजीत धोंडफळे आणि सहकारी यांनी चंदनउटीतून परिश्रम पूर्वक साकारले. आळंदी मंदिरात भाविक, नागरिक, साधक यांना श्रीचे दर्शनास यावर्षीही प्रवेश देण्यात आला नसल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. मोजक्याच वारकरी, भाविकांचे उपस्थितीत रामनवमी उत्सव माऊली मंदिरात साजरा करण्यात आला. 

आळंदी संस्थानचे मंदिरातील प्रथाप्रमाणे राम नवमीचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन करण्यात आले होते. रामनवमी निमित्त माउली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत रामजन्मोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, चोपदार यांचे वतीने गुढी पूजन झाले. श्रीरामजन्मोत्सवा निमित्त श्रींना वैभवी पोशाख करण्यात आला. विना मंडपात मानकरी संतोष मोझे यांचे वतीने ह.भ.प. संभाजी महाराज तरटे यांची कीर्तन सेवा झाली. जन्मोत्सव कीर्तन, पाळणा, आरती, महानैवेद्य, सुंठवडा प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला.

प्रथेप्रमाणे माउलीचे संजीवन समाधीवर चंदन उटीतील वैभवी शिंदेशाही पगडीतील श्रींचे वैभवी राजबिंडे आकर्षक रूप साकारत रामनवमी दिनी पूजा बांधली. यावेळी विविध वस्त्रालंकार, आभूषणे आणि पुष्प सजावट करीत श्रीचे रूप लक्षवेधी सजले. नित्यनैमित्तिक पूजा धार्मिक कार्यक्रम झाले. आळंदी संस्थान तर्फे मानकरी यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद देण्यात आला. श्रीनां धुपारती झाल्यानंतर मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हरीजागर सेवा झाली.

आळंदीत रामजन्मोत्सव उत्साहात साजरा 
येथील श्री आवेकर भावे श्री रामचंद्र संस्थान मंदिरात रामजन्मोत्सवास प्रथा परंपरांचे पालन करीत मोजक्याचा भाविकांच्या उपस्थितीत राम नवमी वार्षिक उत्सव साजरा झाला. या निमित्त गुढी पाडवा ते राम नवमी या कालावधीत कोरोंनाचे महामारीचे संकट काळात शासनाचे आदेश व सूचना प्रमाणे परंपरेने रूद्राभिषेक पूजा, धार्मिक कार्यक्रम झाले. वारकरी शिक्षण संस्थेतील ह.भ.प.भागवत महाराज साळुंखे यांची हृदयस्पर्शी कीर्तन सेवा झाली. यावेळी संत तुकाराम महाराज यांचा अभंग धर्म रक्षावया अवतार घेशी…. यावर आधारित कीर्तन सेवा झाली. यावेळी साळुंखे महाराज यांनी आपल्या मंत्रमुग्ध करना-या वाणीतून अवतार म्हणजे काय, अवतार हा देवाचाच असतो, श्री रामाचाही पूर्ण अवतार आहे. यावर प्रकाश टाकला. श्री प्रभू राम यांचे अनन्य साधार महत्व सांगितले. त्यानंतर श्रीचे जन्मोत्सवाचे कीर्तन, आरती, पाळणा , मंदिर प्रदक्षिणा , महाप्रसाद वाटप झाले. याप्रसंगी वारकरी शिक्षण संस्थेचे उपासक ह.भ.प. आबा महाराज गोडसे, वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मोहन महाराज शिंदे, श्री आवेकर भावे, रामचंद्र संस्थानचे विश्वस्त बिपीन चोभे, श्रीहरी चक्रांकित महाराज, विश्वस्त नरहरी महाराज चौधरी, रविंद्र महाराज, माऊलीचे चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, श्रींचे पुजारी, सेवक लक्ष्मण मेदनकर , भक्तगण उपस्थित होते. मानकरी, पुजारी यांना याप्रसंगी श्रीफल प्रसाद, सुंठवडा महाप्रसाद झाला. सायंकाळी श्री राम दरबार पादुका माऊली मंदिरात परंपरेचे पालन करीत माऊली मंदिरात पूजा व प्रदक्षिणा झाली. यावेळी आळंदी देवस्थान तर्फे विश्वस्त नरहरी महाराज चौधरी यांचेसह उपस्थित मान्यवरांचा नारळ प्रसाद देत सत्कार झाला. श्री राम पादुकांचे मंदिरात स्वागत करून नारळ प्रसाद देण्यात आला. न्यू.अमरज्योत मित्र मंडळाचे वतीने कुऱ्हाडे आळीत श्री रामजन्मोत्सव धार्मिक पूजा, आरती धार्मिक कार्यक्रम झाला. श्री संत गोरोबा काका मंदिरात श्री रामनवमी निमित्त श्रीप्रभुराम अवतार चंदन उटी साकारण्यात आली. यावेळी किरण दाते, किशोर दाते, बल्लाळेश्वर वाघमारे आदि उपस्थित होते.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!