आदर्श घालून देत आहे ‘ते’ स्वतःच… ना गाजावाजा, ना प्रसिद्धी… खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांचे होतेय कौतुक
आदर्श घालून देत आहे ‘ते’ स्वतःच…
ना गाजावाजा, ना प्रसिद्धी…
खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांचे होतेय कौतुक
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
चाकण:- अधिकारी आदेश देतात, अन त्या आदेशानुसार कृती घडते. अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी त्यांचे सहकर्मचारी करताना दिसतात. मात्र दुसऱ्यास आदेश व हुकूम सोडणे सोपे; मात्र त्याची अमलबजावणी स्वतः करणे अवघड. खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यास काहीसे अपवाद आहेत. त्यांच्या कामाची पद्धत काहीशी निराळी आहे. त्यामुळेच त्यांच्याबद्दल ‘कॉमन’ माणसात आदराने बोलले जाते. अर्थात यास काही घटना साक्षी आहेत.
सध्या कोरोना महामारीने संपूर्ण देश हैराण आहे. प्रशासन आपापल्या पद्धतीने या संकटावर मात करण्यासाठी झटत आहे. त्यातही काही अधिकारी आपल्या वेगळ्या व झोकून देऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे लक्षवेधक ठरत आहे. असेच काम खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण करताना दिसतात. ना कोणता गाजावाजा, ना कोणती प्रसिद्धी…. असे त्यांचे धोरण पण दिसते.
मध्यंतरी कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा कमी झाला. त्याचा तुटवडा भासू लागला. अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट न पाहता विक्रांत चव्हाण यांनी चाकण औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन कंपन्यांमध्ये रात्रंदिवस ठाण मांडले. विविध जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत पाठविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका पार पाडली.
रक्ताचा तुटवडा लक्षात घेता त्यांनी महसूल विभाग व बजाज ऑटो कंपनी प्रशासनास साद घातली. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आपल्या सहकर्मचारी व कंपनी प्रशासन याना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्वतः रक्तदान केले आणि रक्तदात्यांचा उत्साह वाढला. त्यानंतर या रक्तदान शिबिरात 307 बाटल्या रक्त संकलन झाले. या शिबिरात बजाज ऑटो चाकणचे विभागीय व्यवस्थापक अमित गंभीर, प्रशासन व्यवस्थापक अनिल गुढेकर, वेल्फेअर अधिकारी सुयोग फुलबडवे यांच्यासह पुणे ब्लड बँकेचे डॉ कमलेश डीबले, डॉ. तनुश्री जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांना याबाबत संपर्क केला असता ते म्हणाले, “आम्ही काही वेगळे केले नाही. जी जबाबदारी आहे ती कर्तव्य भावनेने पार पाडतो आहोत. सद्यस्थितीत जी गरज आहे ती ओळखून कामाची दिशा ठेवली आहे. कोरोनाच्या प्रतिकूल स्थितीत मोठ्या व छोट्या कंपन्यांची मदत घेऊन रक्तसंकलनाचा निर्धार आहे. यात माझा संपूर्ण स्टाफ व कंपनी प्रशासन सहकार्य करीत आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आम्ही अधिकाधिक रक्त संकलन करणार आहोत.”