Tuesday, October 14, 2025
Latest:
कोरोनापिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

पुण्यात पुन्हा निर्बंध कडक, सोमवारपासून नियम बदलणार, आदेश जारी : पहा काय सुरु, काय बंद?

पुण्यात पुन्हा निर्बंध कडक, सोमवारपासून नियम बदलणार, आदेश जारी : पहा काय सुरु, काय बंद?

महाबुलेटीन न्यूज : प्रसन्नकुमार देवकर
पुणे : राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.

पुण्यात देखील आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. सोमवारपासून पुणेकरांना नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे. सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.

पुण्यात काय सुरु काय बंद :-
————————————–
सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

● अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.

● मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.

● रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.

● खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.

● अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.

● लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक

अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

● पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी

● कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. 
====================

पुणे शहरात एकूण रुग्णसंख्या पावणे पाच लाखांच्या वर :-
पुणे शहरात काल नव्याने 258 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 77 हजार 084 इतकी झाली आहे. शहरातील 246 कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 66 हजार 002 झाली आहे. पुणे शहरात काल एकाच दिवसात 5 हजार 795 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 40 हजार 590 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 522 रुग्णांपैकी 314 रुग्ण गंभीर तर 443 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 560 इतकी झाली आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!