कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन करू : किशोर आवारे
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन करू : किशोर आवारे
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : येथील नगरपरिषदेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे वेतन त्वरित द्यावे अन्यथा बुधवार (दि.२३) पासून सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत धरणे आंदोलन करण्याचा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे व प्रवक्ते मिलिंद अच्युत व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबत मंगळवारी (दि.२२) मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी उप मुख्याधिकारी सुप्रिया शिंदे व पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांना निवेदन दिले आहे.
विद्यूत विभाग, अग्निशमन विभाग व कार्यालयीन आस्थापना विभागातील कर्मचार्यांनी त्यांच्या वेतना संबंधित मागण्यांबाबत जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना साकडे घातले होते. आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी किशोर आवारे यांनी प्रयत्न करावे, असे कामगार वर्गाने नमूद केले. नगरपरिषदेच्या विद्युत विभागासह अग्निशमन विभाग व कार्यालयीन आस्थापना विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनात सहभागी होणार आहेत.
कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवण्याचे उत्कृष्ट काम विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यांना फेब्रुवारी २०२१ पासून त्यांचे वेतन दिले गेले नाही. वेतन नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकीरीचे झाले आहे. आई- वडिलांचा वैद्यकीय खर्च, घर भाडे, किराणा, मुलांचे शिक्षण व कर्जाचे हफ्ते आदी भरण्यासाठी तसेच जगण्यासाठी खासगी सावकाराचा आश्रय घ्यावा लागत आहे. कंत्राटी कर्मचारी वारंवार वेतन मागणी करत असून याकडे नगरपरिषद प्रशासन व ठेकेदार कानाडोळा करत आहे. मुजोर अधिकारी व ठेकेदाराच्या कारभाराला कंत्राटी कर्मचारी वैतागले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वेतन जात नाही.
कंत्राटी कामगार बांधवांच्या वेतनाबाबत कोणतेही राजकारण न करता त्वरित मागण्या मान्य करण्याचे आवाहन यावेळी किशोर आवारे यांनी केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर मागण्यासाठी जनसेवा विकास समिती बुधवार (दि.२३) पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
००००