खेड पंचायत समितीचे सभापतीचा आपल्याच पक्षाच्या सदस्यांवर जीवघेणा हल्ला, हवेत गोळीबार, मारहाण करून सदस्यांच्या पतींना सिनेस्टाईलने पळविले… ● सभापती विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केल्याने केला राडा..
खेड पंचायत समितीचे सभापतीचा आपल्याच पक्षाच्या सदस्यांवर जीवघेणा हल्ला, हवेत गोळीबार, मारहाण करून सदस्यांच्या पतींना सिनेस्टाईलने पळविले… ● सभापती विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केल्याने केला राडा..
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज ( दि. २७ मे ) घडली आहे.
पुण्यातील खडकवासला येथील डोणजे गाव परिसरातील डोंगरावरील हॉटेल वाईल्डर नेस्ट या खासगी रिसॉर्ट वर हा जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. सभापती भगवान नारायण पोखरकर, त्याचा भाऊ जालिंदर नारायण पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणूकीवरून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. भगवान पोखरकर यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२० रोजी संपल्या नंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते, म्हणून समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी शिवसेनेचे ६, राष्ट्रवादीचे ४ व भाजपचा १ सदस्य असे एकूण ११ सदस्यांसोबत मिळून दि. २४ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पोखरकर विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्या ठरावाच्या बाजूने येत्या ३१ मे २०२१ रोजी प्रांताधिकारी यांच्यासमोर मतदान होणार होते. त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य सुरक्षिततेच्या कारणाने डोणजे येथील रिसॉर्ट मध्ये थांबले होते.
मात्र ही माहिती पोखरकर यांना मिळाली आणि त्यांनी आज ( दि. २७ मे ) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आपला भाऊ जालिंदर आणि १५ ते २० कार्यकर्त्यांसोबत येऊन बंदूक, कोयता आणि लोखंडी गजानी जीवघेणा हल्ला केला. व त्याच्या भावाने पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. हॉटेलचे दार तोडून महिला सदस्यांचे पती सखाराम शिंदे व संतोष सांडभोर यांना धक्काबुक्की करीत असताना पंचायत समिती सदस्य मंदाताई सखाराम शिंदे व सुनीता संतोष सांडभोर ह्या मधे पडल्या असता त्यांनाही धक्काबुक्की करून अश्लील वर्तन केले. यावेळी सदस्य वैशाली जाधव यांचे पती गणेश जाधव हे रूमच्या बाहेर आले असता त्यांनी भगवान पोखरकरला ओळखले व भगवान मला हात लावायचे करण नाही, असे बजावले. त्यानंतर वॉचमनला मारहाण करून सखाराम शिंदे व संतोष सांडभोर यांना गाडीत बसवून घेऊन ते निघून गेले व मारहाण करून मधेच रस्त्यात सोडून दिले.
या घटनेमुळे खेडच राजकीय वातावरण तापले असून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
००००