महाबुलेटीन दिनविशेष : २६ मे – विलासराव देशमुख जन्मदिन : बाभूळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री…
महाबुलेटीन दिनविशेष : २६ मे – विलासराव देशमुख जन्मदिन
********************************
● बाभूळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री…
जन्म – २६ मे १९४५ (लातूर)
स्मृती – १४ ऑगस्ट २०१२
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा जन्म २६ मे १९४५ रोजी लातूर मधील बाभूळगाव येथे झाला.
विलासराव देशमुख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सर्वप्रथम राजकारणात आले. त्यांनी पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून बी.एस्सी. व बी ए. चे शिक्षण घेतले. त्यानंतर आय.एल.एस. कायदा महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात काही काळ त्यांनी वकिलीही केली. मात्र, त्यानंतर ते पूर्णवेळ समाजकारणात आले.
१९७४ साली बाभूळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. तीन वर्षे ते गावचे सरपंच होते. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्यपद, लातूर पंचायत समितीचे उप-सभापतीपद, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आदींचे संचालकपदही त्यांनी भूषविले.
१९८० साली विलासराव देशमुख पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री, नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून ते प्रारंभी राहिले. १९९५ साली निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या विलासरावांनी त्या पराभवाचा पुढील निवडणुकीत वचपा काढला. त्याच वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे चालून आले.
१८ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व १७ जानेवारी २००३ पर्यंत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर होते. विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीत नेहमीच चढउतार राहिले. २००३ साली त्यांना श्रेष्ठींच्या आदेशामुळे मुख्यमंत्रिपद सोडावे लागले, परंतु त्याच्या पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना दुसर्यांदा मुख्यमंत्रिपद देण्यात आले. मात्र, ते मुख्यमंत्री पदावर असतानाच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या ताज हॉटेलची पाहणी करायला गेले असता सोबत आपला अभिनेता पुत्र रितेश देशमुख आणि चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांनाही घेऊन गेल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना मुख्यमंत्रिपदावरून डच्च्चू दिला, मात्र, सन २००९ मध्ये त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. त्या वर्षी ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही बनले.
ऑगस्ट २००९ मध्ये ते राज्यसभेवर निवडले गेले. मे २००९ ते जानेवारी २०११ पर्यंत केंद्रात अवजड उद्योगमंत्री, जानेवारी २०११ ते जुलै २०११ दरम्यान केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री, जुलै २०११ पासून केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. मात्र, आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वादविवादांना त्यांना सतत सामोरे जावे लागले.
विलासराव देशमुख यांची दोस्तीही खूपच गाजली. सुशिलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांना तर राजकारणात दो हंसो का जोडा असं म्हटलं जायचं. गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांची दोस्ती म्हणजे, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, याच थाटाची होती. कट्टर विरोधी पक्षांत असुन सुद्धा त्यांच्या दोस्तीला कधीही तडा गेला नाही. गोपीनाथ मुंडे यांची आणि त्यांची दोस्ती पुण्यापासूनची. त्यांची कारकीर्दही समांतरच. मुंडेंनी विलासरावांच्या लगतच्या मतदारसंघातून पहिली विधानसभा लढवली ती १९८० साली. दोघेही एकदा एकदा पराभूत झाले होते. त्यानंतर दोघेही दिल्लीच्या राजकारणात गेले.
विलासराव देशमुख यांची आठवण सांगताना एकदा गोपीनाथ मुंडे म्हणाले होते. विलासराव दिलखुलास होते. माझ्या अंगावर नेहमी जे जॅकेट दिसते त्यामागे विलासरावांची प्रेरणा आणि सूचना असल्याचे मुंडे म्हणाले. आम्ही दोघे पहिल्यांदाच आमदार झालो त्यावेळी विलासराव जॅकेट घालून विधानसभेत आले. त्यांचे जॅकेट पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. विलासराव जॅकेटमधे तुमचं रूप रुबाबदार दिसतं असे मी त्यांना सांगितले. दुसऱ्या दिवशी विलासराव माझ्याकडे आले. हातातल्या पिशवीतून त्यांनी एक काळंकुळीत जॅकेट काढलं आणि मला म्हणाले गोपीनाथराव तुमच्यासाठी हे जॅकेट माझ्यापेक्षाही तुम्हाला ते शोभून दिसेल. मित्राने दिलेलं पहिलं जॅकेट घातलं आणि आजूबाजूच्या सर्वच आमदारांनी वाह..वाह.. गोपीनाथराव राजबिंडे दिसता.. अशी प्रतिक्रिया दिली. तेव्हापासून मी कायम जॅकेट घालण्याचा निर्णय घेतला. रुबाबदार दिसावं.. असं माझ्या मित्रानं मला सांगितलं.
विलासराव देशमुख यांचे निधन १४ ऑगस्ट २०१२ रोजी झाले.
********************************