Friday, April 18, 2025
Latest:
अग्रलेखआरोग्यआर्टिकलपुणे विभागमहाराष्ट्र

अतिथी संपादकीय

महाराष्ट्र वाट शोधेन‼️

महाराष्ट्र राज्य हे या देशाला दिशा देणारं राज्य म्हणून ओळखले जाते. एकदा बदलाचे वारे महाराष्ट्रात वाहिले कि ते भारतभर पसरतात असा आजवरचा राजकीय इतिहास आहे असं मानलं जातं. संकटकाळी महाराष्ट्र राज्य देशाचे नेतृत्व करते हे अनेकवेळा सिध्द झाले आहे. सह्याद्री दिल्लीच्या मदतीला धावलेला अनेकदा देशानं पाहिलाय.
पण आज महाराष्ट्र अडचणीत सापडलाय. महाराष्ट्र कोरोनाच्या बिकट परिस्थिती मधून जातोय. माणसांची अवस्था किड्यामुंगीसारखी झाली आहे. औषधांचा तुटवडा आहे, आँक्सिजन पुरेसा नाही, हाँस्पिटल चा आभाव आहे. लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत. आर्थिक घडी पार विस्कटून गेलीय. छोटे दुकानदार जेरीस आले आहेत.मजुरांना पलायन करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षे वाया चालली आहेत. सगळीकडे नैराश्य असल्याचे पहायला मिळते. यातून सावरता येईल का हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे.
राज्यावर यापूर्वी देखील अशी वेळ आली होती. साल होतं १९७२ दुष्काळ वर्ष. राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. लोक टाचा घासून मरत होते. प्यायला पाणी नव्हते. महाराष्ट्रातील ६०% जनता त्या दुष्काळी परिस्थितीत ग्रासली होती. १९७२ च्या दुष्काळी परिस्थिती चा सामना तत्कालीन सरकारने मोठ्या नेटानं केला त्यावेळी विरोधकांनी देखील कुरघोडीचं राजकारण न करता हातात हात देत दुष्काळाशी दोन हात केले. तेव्हाच्या विरोधकांची नावे जर ऐकली तर आज त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारे विरोधक काय करतायत हे पाहिल्यावर वाईट वाटते. आदर्शाची पायमल्ली होताना हल्ली रोज दिसते. तेव्हा विरोधक होते रामभाऊ म्हाळगी, केशवराव धोंडगे, म्रुणाल गोरे आदींसारखे मान्यवर विरोधीपक्ष नेते होते. त्यांनी जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं.तेव्हा महाराष्ट्र राज्यातील सर्वच राजकारण्यांनी एकत्र येऊन या दुष्काळी परिस्थितीचा सामना केला.त्याचं भांडवल केले नाही. आणि जनतेची दिशाभूल देखील केली नाही.
जे १९७२ साली झालं ते आज होताना दिसत नाही. अर्थात तसं आजदेखील करता येऊ शकलं असतं परंतू तितका राजकीय परिपक्व पणा हल्लीच्या राजकारण्यांमध्ये पहावयास मिळत नाही हा या राज्यातील जनतेचा दैवदुर्विलास आहे असंच म्हणावे लागेल.
७२ च्या दुष्काळात सरकार आणि विरोधकांनी एकत्र येऊन काम केले राज्यात ठिकठिकाणी जनावरांसाठी चाराछावण्या उभारल्या. जनतेसाठी पिण्याचे पाणी पुरवले. तत्कालीन केंद्र सरकारने देखील महाराष्ट्रात मदत केली. मजुरीची कामे महाराष्ट्रात सुरू केली. मागेल त्याला काम मिळाले. पुढे हि ” रोजगार हमी योजना ” म्हणून ओळखली जाऊ लागली. आजची केंद्रातील मनरेगा ची मुळ संकल्पना महाराष्ट्राने देशाला दिली असं म्हटलं तर ते अयोग्य ठरणार नाही.
आज परिस्थिती अतिशय भयानक आहे. कोंबडे झुंझल्याप्रमाणे राजकीय पक्ष नेते झुंझताना रोज पहायला मिळतायत. आणि जनतेच्या वाट्याला आल्या आहेत हाल, अपेष्टा, अवहेलना, राजकारणी इतके असंवेदनशील कसे होऊ शकतात हाच या घडीला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे.

© गणेश बेल्हेकर
राजगुरूनगर
दि. २५.०४.२०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!