चंद्रकांत पाटील हे असंस्कृत व अशिक्षित बोलून पदवीधर मतदारांना लाजेने मान खाली घालायला लावणारे व केवळ बोलणारे नेते : आमदार रोहित पवार
कंपन्यांमध्ये ठेके घेणारे पोलीस व अधिकारी यांची चौकशी करा व म्हाळुंगे पोलीस चौकी बंद करा : आमदार दिलीप मोहिते पाटील
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : “असंस्कृत व अशिक्षित बोलून पदवीधर मतदारांना लाजेने मान खाली घालायला लावणारी वक्तव्ये ज्यांनी केली, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी १२ वर्षे पदवीधर मतदारांचे नेतृत्व केले. काम काहीच केले नाही. ते केवळ बोलणारे नेते आहेत.” अशी बोचरी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाआघाडीचे पदवीधर संघाचे उमेदवार प्रा. अरुण लाड व शिक्षक संघाचे उमेदवार आजगावकर यांच्या प्रचारार्थ हॉटेल राजरत्न येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
उच्च विभूषित पदवी घेऊनही तरुणांना नोकऱ्या नाही, शिक्षकांना शिक्षणबाह्य कामाचा अतिरिक्त भार असतो.
— निर्मलाताई पानसरे ( अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे )
हे सरकार पुढील महिन्यात पडणार हे विरोधकांचे दिवास्वप्न आहे. बेरीज केली तर महाआघाडीचे पारडे जड आहे. उमेदवार हा चारित्र्यसंपन्न असावा, अरुण लाड हे स्वातंत्र्य संग्राम लढ्यातील कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील नाना पाटलांच्या पत्री सरकार मध्ये होते. अरुण लाड रयत शिक्षण संस्थेवर काम करतात. आजगावकर यांचे वडील शिक्षण क्षेत्रात होते. कोरोनामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले. कोरोनामुळे ठराविक कमी संख्येत मेळावा घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
आमच्या औद्योगिक परिसरात स्थानिकांना डावलले जाते. स्थानिक तरुणांना नोकरीत कायम केले जात नाही. कामगार युनियन होऊ नये, म्हणून गुंडांची मदत घेऊन भाईगिरी केली जाते. कंपन्यांमधील एम. डी, अधिकारी ठेकेदारासोबत भागीदारी करतात. तसेच येथील पोलीस अधिकाऱ्यांची स्क्रॅप, सिक्युरिटी, ट्रान्सपोर्ट आदी प्रकारची कंपन्यामध्ये ठेके आहेत याची चौकशी व्हावी. म्हाळुंगे पोलीस चौकी बंद झाली पाहिजे, येथे फक्त हप्ते गोळा केले जातात, ते अनाधिकृत आहे. आमच्या तालुक्यात इंडस्ट्रीज असूनही आमच्या भूमिपुत्रांना त्याचा फायदा नाही. त्यामुळे आम्हाला पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून बाहेर काढा. यासंदर्भात गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. भामा आसखेडच्या पाण्यावर आमचा हक्क आहे, आता उर्वरित पाणी पुणे, पिंपरी-चिंचवडला देणार नाही, भविष्यात माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे.
—- दिलीप मोहिते पाटील ( आमदार खेड )
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, माजी तालुका प्रमुख गणेश सांडभोर, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, काँग्रेस युवती प्रदेश सरचिटणीस प्रिया नारायणराव पवार, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष संध्याताई जाधव, राजाराम लोखंडे, युवक तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, युवा नेते मयूर मोहिते आदी उपस्थित होते.
कैलास सांडभोर यांनी प्रास्ताविक केले. सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर गणेश सांडभोर यांनी आभार मानले.