सरपंचांनी केला खासदारांना कॉल,…. अन खासदारांनी घेतले अधिकाऱ्यांना कॉन्फरन्सवर…अखेर ग्रामस्थांची गैरसोय झाली दूर…
…..अन विजवीतरण अधिकाऱ्यांनी गावात बसविला नवीन ट्रान्सफॉर्मर
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
केंदूर : अचानक स्फोट होऊन शिरूर तालुक्यातील केंदूर महादेववाडी (भवरानगर) येथील पीरवस्ती डीपी जळाल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या आदेशानुसार महावितरणने तातडीने कार्यवाही नवीन डीपी बसविला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली.
शिरूर तालुक्यातील केंदूर, महादेववाडी (भवरानगर) येथील पीरवस्ती डीपी (६३ के.व्ही.) २७ सप्टेंबर रोजी अचानक स्फोट होऊन जळाल्यानंतर सरपंच पांडुरंग साकोरे सातत्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे नवीन डीपी बसविण्याची मागणी करीत होते. परंतु आठ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही नवीन डीपी बसविण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेरीस सरपंच साकोरे यांनी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. विशेष म्हणजे डॉ. कोल्हे यांनी तत्काळ दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स कॉल लावला. तसेच तातडीने कार्यवाही करुन नवीन डीपी बसविण्याचे आदेश दिले.

डॉ. कोल्हे यांच्या आदेशानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर हालचाल करुन अवघ्या चार तासांत नवीन डीपी बसवून तो कार्यान्वितही केला. डॉ. कोल्हे यांनी तत्परतेने लक्ष घालून कार्यवाही केल्याबद्दल केंदूरचे सरपंच साकोरे व ग्रामस्थांनी कौतुक केले. तसेच यासाठी राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे त्यांचेही आभार मानले.


