काव्यमंच : आगटी…!!
काव्यमंच : आगटी…!!
————-
नको नको पावसा तू
असा आवकाळी पडू,
हातातोंडाशी आलेलं
पीक लागलं रे सडू ….!!
घाम गाळता गाळता
तुझे गाईले अभंग,
त्याच्या घामाच्या कष्टाचे
विठु ऊठू दे तरंग …!!
वावराच्या बांधाहून
बाप न्याहळतो मळा,
पोटारल्या धाटासाठी
किती लावला रे लळा…!!
आगटीच्या आडोशाला
बाप जागल करतो,
डामक्याच्या पिकामधी
नवं सपान पेरतो …..!!
आभाळाच्या चांदण्यात
रोज तिकाटणं येतं,
धुमसल्या आगटीत
रोज तांबडं फुटतं …!!
दवारल्या शाळूवर
थवा पाखराचा येतो,
चिवचिवल्या चोचीत
बाप साखरच होतो….!!
बाप विठ्ठल होऊन
पिकवली काळी आई,
माय त्याच्या सोबतीला
मला दिसे रखुमाई ….!!
©️ प्रकाश बनसोडे, चाकण