Saturday, August 30, 2025
Latest:
इंदापूरकोरोनाराजकीयविशेष

केवळ जाळ अन् धूरच, लोकांच्या उपयोगाचे काही शिजतच नाही

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे 
इंदापूर : कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांनी खेळलेल्या सुरपाट्याचा एक डाव व तथाकथित पतंगबाजीवरुन माजी मंत्री, भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर वाद प्रतिवादामुळे इंदापूर तालुक्यातील राजकारण ढवळले गेले आहे.
कोरोना निर्मुलनासाठी तालुक्यात खुप काही करण्याची क्षमता या दोघांमध्ये असून देखील त्याकडे सारासार दुर्लक्ष होवून, केवळ जाळ अन् धूरच दिसतो आहे. लोकांच्या उपयोगाचे काहीच शिजत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.
इंदापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्ताचा आकडा दीडशेची मजल गाठत आला आहे. तालुक्यात इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या घश्यातील स्त्राव चाचणीकरीता घेण्याची सोय आहे. कोरोनाग्रस्तांच्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे घश्यातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या व त्यामधील कोरोनाची लक्षणे असणा-या मात्र प्रकृतीचा फारसा त्रास नसणारांवर उपचार करण्याकरिता दाखल करुन घेण्यासाठी शासकीय वसतिगृह प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. तेथे दाखल असणा-या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला तर त्याची रवानगी घराकडे करायची. गंभीर रुग्णांना खाटांच्या उपलब्धतेनुसार पुणे, मुंबई, सोलापूर भागातील दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. हे ठिकाण औपचारिकदृष्ट्या रुग्णालय नसल्याने, तेथे रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
अत्यावश्यक बाब म्हणून तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असणा-या इंदापूर शहरात कोरोनावरील उपचार केंद्र मंजूर करुन घेता येते. राज्यमंत्री असणारे दत्तात्रय भरणे व केंद्रात सत्ता असणा-या भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विशेष प्रयत्न केले तर ते होण्यासारखे आहे. तथापि तशी इच्छाशक्ती दाखवली जात नाही. एकमेकांना ‘उजनीच्या पाण्यात बघणे’ यातून परस्परांची उणीदुणी काढण्याचा दोघांचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे.
कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बराच काळ तटस्थ बसले. याचे कोडे लोकांना पडले आहे. ज्यांना मतदारांनी निवडून दिले ते अश्या आणीबाणीच्या परिस्थितीत काय करतात, हे सर्वांना लक्षात आणून देण्यासाठीच पाटील यांनी तसे केले होते, असे चर्चिले जात आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी झाल्याने इंदापूर तालुक्यातील तरूणांना रक्तदानासाठी प्रवृत्त करून करण्याचे काम राज्यमंत्री भरणे यांनी केले, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. या कामात जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने व त्यांच्या सोनाई समुहाचे योगदान ही दुर्लक्ष करण्याजोगे नाही, ही  वस्तुस्थिती आहे.
लॉकडाऊनच्या प्रारंभापासून गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करुन दत्तात्रय भरणे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडल्याचा दावा भरणे यांचे समर्थक करत आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जीवनावश्यक वस्तुंचे कीट वापरले. त्यासाठी बहुतांशी ठिकाणी दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते, असे वरकरणी दिसते. याच मुद्द्याला धरुन हर्षवर्धन पाटील यांनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्जीतील लोकांनाच अनुदानाचे वाटप करण्यात आले, असा आरोप केला आहे. वाटप केलेले अन्नधान्य कोठून आले. तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, एमआयडीसी’तील उद्योगपती, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांच्याकडून सरंजाम पद्धतीने लूट केली गेली. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून त्याचे वाटप केले. यातून प्रत्येक गावात लोकांचे गट निर्माण केले. सामाजिक दरी निर्माण केली. स्वतःची प्रसिद्धी केली, असे निःसंदिग्धपणे पाटील म्हणत आहेत. त्यामुळे वाटप कुणी व नेमके कसे केले हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या खेरीज इंदापूर तालुक्याच्या लोकसंख्येच्या ०.१ टक्के लोकांच्या घश्याच्या स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले आहे, असा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे. तालुक्यात अंदाजे वीस हजार लोक बाहेरून आले आहेत. त्यांच्या तपासणी, विलगीकरणाची काय व्यवस्था केली ? असा सवाल ही त्यांनी भरणे यांना विचारला आहे. भरणे या सर्वांची उत्तरे कशी देणार ? व हर्षवर्धन पाटील कोरोना निर्मुलनासाठी केंद्रातून मदत आणणार का ? याची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!