घरात घुसून मारहाण, महिला गंभीर जखमी, पाच जणांवर गुन्हा दाखल
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन घातक हत्यारानिशी घरात घुसून मध्यमवयीन दांपत्य व मुलास बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरुन पाच जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात रविवारी ( दि.२६ जुलै ) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी ( दि.२६ जुलै ) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेटफळ हवेली ( ता. इंदापूर ) येथे ही घटना घडली आहे. बबलु मदने, पप्पु मासाळ, दीपक ठवरे ( सर्व रा. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे ), रामा भाळे ( रा. खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अरुण दादु काळे ( वय ६२वर्षे, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर, जि. पुणे ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या घटनेत फिर्यादीची पत्नी सुनिता काळे ( वय ५५ वर्षे ), मुलगा गणेश काळे ( दोघे रा. शेटफळ हवेली ) हे जखमी झाले आहेत. महिलेच्या कपाळ, डोळा, जबडा व डाव्या पायाला मार लागला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी कोयता, तलवार, काठ्या अशा घातक हत्यारांनिशी फिर्यादीच्या घरात घुसून त्यांची पत्नी सुनिताला काठीने मारहाण करुन त्यांचा डावा डोळा, कपाळ व डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापती केल्या. फिर्यादी व त्यांचा मुलगा गणेश यास कोयता, तलवार व काठ्याचा धाक दाखवत शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली, अश्या आशयाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक मड्डी पुढील तपास करत आहेत.