यंदा बकरी ईद, दहीहंडी, गणेशोत्सव साधेपणाने साजरी करा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन
बकरी ईद प्रतीकात्मक स्वरूपात व घरच्या घरी साजरी करा , मुंबईत दहीहंडी रद्द केल्याचा दहीहंडी उत्सव समन्वय समितीचा निर्णय
महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात कोरोना संकट पसरू लागल्यापासून सर्व सण साधेपणाने घरातल्या घरात साजरे केले जात आहेत. या विशेष परिस्थितीचे भान ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नागरिकांना बकरी ईद साधेपणाने आणि प्रतिकात्मक स्वरुपात घरातल्या घरात साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
मागील चार महिन्यांपासून गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार थोपवण्यासाठी सर्व धर्मियांनी सहकार्य केले आहे. गर्दी टाळून घरातल्या घरात साधेपणाने सण साजरे केले आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे सण साधेपणाने घरातल्या घरात साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
सण साजरे करण्यासाठी सर्वांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात चूक केल्यास कोरोना संकटाची आटोक्यात येत असलेली तीव्रता पुन्हा वाढेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांनी मुस्लिम बांधवांना बकरा खरेदीसाठी जाणे टाळा, असे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. तर दहीहंडी उत्सव समन्वय समितीने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना संकटामुळे दहीहंडी उत्सव रद्द
—————————————
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी उत्सव समन्वय समितीने घेतला आहे. दहीहंडी उत्सव समन्वय समितीची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सर सलामत, तो पगडी पचास’ असं म्हणत दहीहंडी उत्सव समितीने निर्णय जाहीर केला.
‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत दरवर्षी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांत गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई, ठाणे शहरांत विविध ठिकाणी गल्लोगल्ली दहीहंडी बांधण्यात येतात आणि या हंड्या फोडण्यासाठी विविध ठिकाणाहून दहीहंडी पथके येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत हा सण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ईद संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना
—————————————————-
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच इथून पुढे व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.