खाकी वर्दी…कर्तव्यापलीकडेही !
महाबुलेटिन नेटवर्क / हनुमंत देवकर
चाकण : कर्तव्यभाव जपताना सामाजिक भान जपणाऱ्या त्या कोविड योध्याचे कौतुक आहे. खाकी वर्दीतील कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना ‘तो कोविड योद्धा’ आपल्या सहकाऱ्यांचीही काळजी घेत आहे.
चाकण एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) पोलीस चौकीतील पोलीस हवालदार अरुण लगड मेजर ( वय ५० वर्ष, रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे ) हे त्या कोविड योध्याचे नाव. मेजर सामाजिक भावनेतून नियमितपणे पोलीस चौकी मध्ये फवारणी करून पोलीस चौकी निर्जंतुकीकरण करून घेत आहेत. फवारणीसाठी लागणारा पंप त्यांनी स्वखर्चाने आणला असून ते नियमितपणे फवारणी करतात. आपल्यासोबत कर्तव्यावर असणाऱ्या सहकाऱ्यांच्या आरोग्याच्या काळजीबाबत दक्षता हा कोविड योद्धा घेत आहे. ते दररोज सकाळी कामावर आल्यावर पहिल्यांदा संपूर्ण पोलीस चौकीची फवारणी करतात. चौकी निर्जंतुक केल्यानंतर मग कामाला लागतात. मेजर यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि सहकाऱ्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्याच्या स्वभावाचे कौतुक नाही झाले तर नवलच ! त्यांची ही कृती निश्चितच कोविड योध्याला शोभणारी व कौतुकास्पद आहे.यासाठी त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांचे सहकार्य लाभते.