सामान्य जनता हेच काँग्रेस पक्षाचे खरे बळ : आमदार संजय जगताप
महाबुलेटीन नेटवर्क/ प्रतिनिधी
इंदापूर : सामान्य जनता हेच काँग्रेस पक्षाचे खरे बळ आहे. जनतेशी नाळ जुळल्यानेच अनेक संकटे येवून देखील काँग्रेसचे अस्तित्व कायम टिकून आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी इंदापूरातील पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना केले.
जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी ही आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी तालुका काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्त्या करण्यात आल्या.
जगताप म्हणाले की, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सन २००९ पर्यंत इंदापूर तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व होते. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अचानक काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशाआधी काँग्रेसच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना पक्ष सोडू नये अशी गळ घातली होती. तर अनेकांनी ते पक्ष सोडत असल्याबद्दल साखर वाटत आनंदोत्सव साजरा केला होता, असे ते म्हणाले.
पाटील यांच्या पक्षांतरामुळे इंदापूर तालुक्यात मजबूत असणारी काँग्रेस अचानक कमकुवत झाल्याचे दिसत आहे, असे सांगून जगताप म्हणाले की, इंदापूर नगरपरिषद व पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात हर्षवर्धन पाटील गटाचेच वर्चस्व आहे, ही वस्तुस्थिती आहे.
दरम्यानच्या काळात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत व त्यांच्या सहका-यांनी पक्ष संघटनवाढीसाठी अथक काम केले याबद्दल जगताप यांनी त्यांची प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आगामी काळात होणा-या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे बळ देईल. इंदापूर नगरपरिषद हेच आपले पहिले टार्गेट असेल असे ही ते यावेळी म्हणाले.
संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी जकीरभाई काझी, इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी बिभीषण लोखंडे, इंदापूर शहराध्यक्षपदी तानाजीराव भोंग, शहर उपाध्यक्षपदी तुषार चिंचकर, शहर कार्याध्यक्षपदी चमनभाई बागवान, तालुका सरचिटणीसपदी नितीन राऊत, इंदापूर शहर सहसचिवपदी सुरेश लोखंडे,
विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी शंभूराजे साळुंके, उपाध्यक्षपदी प्रमोद खबाले यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
नियुक्तीनंतर बोलताना पुणे जिल्हा सरचिटणीस जकीर काझी म्हणाले की, सामाजिक कार्य हाच आपल्या राजकारणाचा पाया आहे. त्याच्या जोरावरच तालुक्यात पक्षाला ताकद देण्याचे काम आपण करणार आहोत.
शहराध्यक्ष तानाजीराव भोंग म्हणाले की, ब-यावाईट प्रसंगात पक्षाच्या विचारांशी कदापि तडजोड केली जाणार नाही. पक्षवाढीस प्राधान्य दिले जाईल.