Saturday, April 19, 2025
Latest:
इंदापूरविशेष

राजगृहावरील हल्ल्याचा इंदापूर विचार मंथनकडून तीव्र निषेध

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान, जागतिक दर्जांचे ग्रंथसंग्रहालय असणा-या राजगृहावरील हल्ल्याचा इंदापूर विचार मंथन ग्रुपच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. हल्लेखोर व त्यांच्या पाठीशी असणारांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
इंदापूर विचार मंथन ग्रुपचे प्रमुख, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ व इतर सदस्यांनी नगरपरिषदेच्या प्रांगणातील छ. शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर तेथेच निषेधाची सभा घेतली.
 या वेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, “कोरानाच्या पार्श्वभूमीवर अशांतता निर्माण व्हावी. लोकांमध्ये गैरसमज निर्माण व्हावेत, यासाठी जागतिक दर्जाचे ग्रंथसंग्रहालय असणा-या राजगृहावर अज्ञातांनी हल्ला केला असावा. डॉ.आंबेडकरांनी जमवलेल्या ग्रंथसंपदेवर घाला घातला तर विचार संपेल, असे समाजकंटकांना वाटत असेल तर त्यांनी हे जाणून घ्यावे की,-डॉ. आंबेडकर केवळ पुस्तकात राहिले नाहीत. ते भारतीयांच्या मनामनात, घराघरात गेले आहेत. पुस्तके प्रत्येकाच्या मेंदूमध्ये साठवली गेली आहेत. असे भ्याड हल्ले करुन विचार संपत नसतात. समाज कंटकांनी आत्मपरीक्षण करावे,” असे आवाहन करुन प्रा. ताटे म्हणाले,  “हल्लेखोर कोण आहेत. त्यांच्या पाठीशी कोण आहेत त्यांचा शोध शासनाने घ्यावा. ताब्यात घेवून त्यांची चौकशी करावी. राजगृहाची संरक्षण व्यवस्था वाढवावी.”
कवी व सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचन म्हणाले, “हा हल्ला निवासस्थानावर नसून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरचा हल्ला आहे. हल्ल्यामागे कोणी धर्मांध, समाजकंटक असतील त्यांना शासनाने शोधून काढावे.”
या वेळी विशाल चव्हाण, हनुमंत कांबळे, वसंत आरडे, नगरसेवक अमर गाडे, नितीन आरडे, हमीद आत्तार, सोमनाथ पिंपरे व इतर सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!