Friday, April 18, 2025
Latest:
कृषीकोरोनामहाराष्ट्र

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
सहकारमंत्री पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोविड-19 चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. कोविड-19 चा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला.
सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. तिसऱ्या यादीतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी २ हजार कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जुलै अखेरपर्यंत सव्वा अकरा लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ८ हजार २०० कोटी रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकारमंत्री पाटील यांनी केले.
दरम्यान कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोविड-19 च्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज द्यावे, अशा सूचनाही शासनाने बँकांना दिल्या होत्या, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!