खुनाचे फोटो इंस्टाग्रामवर ठेवल्याने महाळुंगे इंगळे गावातील अपहृत तरुणाचा निर्घृण खून, एकास अटक, मृतदेह महाराष्ट्र-गुजरात बॉर्डरवरील जंगलात जाळल्याची आरोपीची कबुली
महाबुलेटीन न्यूज
चाकण : चाकण उद्योगनगरीतील महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील १० दिवसापूर्वी अपहरण झालेल्या १८ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. आदित्य युवराज भांगरे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्यला बेदम मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील जंगलात जाळल्याची धक्कादायक माहिती चाकण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी अमर नामदेव शिंदे ( वय २५ वर्षे, रा. कासार आंबोली, ता. मुळशी. जि. पुणे ) यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, १६ मार्च २०२४ रोजी महाळुंगे इंगळे गावातील भांगरे वस्ती येथील आदित्य युवराज भांगरे (वय-१८ वर्षे) यास काही अनोळखी व्यक्तींनी घराजवळून अपहरण केल्याची फिर्याद आदित्यच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता एका संशयित आरोपीस चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले होते. आरोपीने खुनाची कबुली देताना सांगितले कि, त्याचा सहकारी आरोपी राहुल पवार याचे भावाचा खून झाला होता. त्याचे छन्न विछिन्न अवस्थेतील चेहऱ्याचे फोटो इंस्टाग्रामला पोस्ट केले होते. याचा राग मनात धरून आदित्यला बेदम मारहाण करून वाहनातच गळा आवळून निर्घृण खून केल्याची कबुली अटक केलेल्या आरोपीने दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट देऊन आदित्यचे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे नमुने जुळवून प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
या गंभीर घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व कल्याण घाडगे हे करत आहेत.