आईच्या निधनानंतर स्मृती जतन करण्यासाठी खराबी कुटुंबीयांनी खड्ड्यात अस्थी टाकून केले आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण… खराबी कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम
चाकण : खराबवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास खराबी, सुनील खराबी व राजेंद्र खराबी यांच्या मातोश्री श्रीमती चंद्रभागा भागुजी खराबी ( वय ८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाशभाऊ खराबी यांच्या मार्गदर्शनाखाली खराबी कुटुंबीयांनी शेतातील खड्ड्यात रक्षाविसर्जन करून त्यात आंब्याची झाडे ‘स्मृती वृक्ष’ म्हणून लावण्यात आली. खराबी परिवाराने पर्यावरणपूरक उपक्रम राबवून आईच्या आठवणी जतन केल्या असून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
‘अस्थी व रक्षा विसर्जनातून वृक्षसंवर्धन…
वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचे रक्षण…
व दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीचे जतन…’
यावेळी मुलगी आशाबाई निवृत्ती शिंदे, लताबाई ज्ञानेश्वर तापकीर तसेच कुटुंबातील सर्व सदस्य व नातेवाईक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या संकल्पनेनुसार, खराबी परिवाराने पाणी प्रदूषण रोखण्यासाठी अस्थी विसर्जन नदीपात्रात न करता शेतात आंब्याची झाडे लावून त्यांच्या स्मृतींचे जतन केले आहे. गावातील व्यक्तीच्या निधनानंतर ‘स्मृती वृक्ष’ लावण्याची परंपरा गावातील ग्रामस्थांनी सातत्याने चालू ठेवली आहे.