महाळुंगे गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधवा महिलांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, विधवा प्रथा बंदचा ग्रामसभेत ठराव, ग्रामपंचायतच्या वतीने १००० कुटुंबांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप
महाळुंगे गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधवा महिलांच्या हस्ते होणार ध्वजारोहण,
विधवा प्रथा बंदचा ग्रामसभेत ठराव,
ग्रामपंचायतच्या वतीने १००० कुटुंबांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप
महाळुंगे इंगळे : गावामध्ये विधवा प्रथेचे निर्मूलन करण्याचा ठराव ग्रामसभेत संमत झाला असून येत्या १५ ऑगस्ट निमित्त खेड तालुक्यातील श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे गावात ध्वजारोहण करण्याचा मान विधवा महिलांना देण्याचा निर्णय सरपंच मंगलताई राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने महाळुंगे इंगळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हर घर तिरंगा उपक्रमाला अनुसरून ग्रामपंचायतीने १००० कुटुंबांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप सुरू केले आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने ओला कचरा व सुका कचरा वेगळा करणे करिता ग्रामपंचायतीने ७५० कुटुंबांना मोफत डस्टबिनचे वाटप १४ वा वित्त आयोगाचे निधीतून केलेले आहे. कचरा संकलनासाठी नवीन ट्रॅक्टर व नवीन घंटागाडी खरेदी केलेली आहे. त्याचे लोकार्पण १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वर्ग रथाची खरेदी केलेली असून त्याचे लोकार्पण देखील १५ ऑगस्टला केले जाणार आहे. या सप्ताहात महिला मेळावा, महिला बचत गट मार्गदर्शन, ज्येष्ठ मंडळींचा सत्कार, मोबाईल वापराचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन, अंगणवाडीतील मुलांना मोफत फळे वाटप, सेंद्रिय शेती मार्गदर्शन, शेतकरी मेळावा वृक्षारोपण, प्रभात फेरी, शालेय स्पर्धा, पर्यावरण संवर्धन, आदी विविध कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सरपंच मंगलताई राजेंद्र भोसले, उपसरपंच शेखर तुपे, सदस्य किशोर भालेराव, ऋषिकेश मिंडे, लक्ष्मण महाळुंगकर नितीन फलके, विश्वनाथ महाळुंगकर, मनोहर इंगवले, पांडुरंग काळे, अर्चना महाळुंगकर, मयुरी महाळुंगकर, वैशाली महाळुंगकर, बेबीताई मेंगळे, वैशाली जावळे, जयाताई वाळके, दिपाली भोसले, पल्लवी भालेराव, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी केले आहे.
0000